मुंबई - शहरात बुधवारी रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. यामुळे रस्ते वाहतूक मंद झाली असून सब वे बंद झाले. यातून सत्ताधाऱ्यांची नियोजन शुन्यता दिसते. महापालिकेच्या नियोजनात कमतरता दिसत आहे. तसेच पूर्व नियोजित व्यवस्था करण्यात महापालिका फेल गेल्याची टीका भाजपचे नेते आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. त्यामुळे या भ्रष्टाचाऱ्यांना सत्तेतून आम्ही बाहेर काढू असा इशाराही शेलार यांनी यावेळी दिला आहे. मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला भेट दिल्यानंतर शेलार हे माध्यमांशी बोलत होते.
भ्रष्टाचाऱ्यांना सत्तेतून आम्ही बाहेर काढू - मुंबईमध्ये बुधवारी रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गुरुवारीही मुंबईत जोरदार पाऊस पडत होता. यामुळे सखल भागात पाणी साचले. तर रेलवे वाहतूक ठप्प झाली होती. मिलन सब वे काही वेळासाठी बंद करण्यात आला होता. शुक्रवारी पावसाने उघडीप घेतल्यावर आशिष शेलार यांनी पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला भेट दिली. या भेटीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना, काल मुंबईत चांगला पाऊस झाला, त्यामुळे संपूर्ण सब-वे बंद झाले, रस्ते वाहतूक मंदावली. यामधून महापालिकेतील सत्ताधाऱ्यांची नियोजन शुन्यता दिसते. या आगोदर नियोजन नीट केले असते, तर बरे झाले असते. महापालिकेच्या नियोजनात कमतरता दिसत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. भ्रष्टाचाऱ्यांना सत्तेतून आम्ही बाहेर काढू. आगामी निवडणुकीत आमचा विजय निश्चित असल्याचेही यावेळी शेलार म्हणाले.
भूमिगत टाक्या ही तात्पुरती व्यवस्था - मुंबईमध्ये दरवर्षी पाऊस पडल्यावर, हिंदमाता, मिलन सब वे, किंग सर्कल आदी ठिकाणी पाणी साचते. यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प होऊन मुंबई थांबते. यासाठी हिंदमाता आणि मिलन सब वे येथील साचणारे पाणी साठवण्यासाठी भूमिगत टाक्या उभारण्यात आल्या आहेत. यावर बोलताना टाक्यांचा प्रकल्प, हा तात्पुरती व्यवस्था आहे. पूर्व नियोजित व्यवस्था करण्यात महापालिका फेल गेली आहे, अशी टीकाही शेलार यांनी केली.
संजय राऊतांवर टाळले बोलणे - शिवसेना नेते संजय राऊत यांना पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी ईडीची नोटीस आली आहे. आज संजय राऊत यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. याबाबत बोलताना, चौकशी यंत्रणा त्यांचे काम करेल, मी त्यात भाष्य करणे योग्य नाही, असे शेलार म्हणाले.
भाजपची सत्ता पालिकेत आणण्यासाठी कामाला लागलो - राज्यात उद्धव ठाकरे यांचे सरकार पडल्यावर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत. तर भाजपचे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत. राज्यात भाजपच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन झाल्याने आपण त्यात मंत्री होणार का असा सवाल त्यांना यावेळी माध्यम प्रतिनिधींनी त्यांना केला. यावर मी भाजपची सत्ता महापालिकेत आणण्यासाठीच्या कामाला लागलो असल्याची माहिती शेलार यांनी दिली.