मुंबई - राज्यपालांना सत्तास्थापनेचे पत्र देऊन विरोधक पागल झालेले आहेत. राज्यपालांना पत्र देताना कायद्याप्रमाणे नेता निवडलेला नाही. त्यामुळे विरोधक बुद्धिभेद असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.
हेही वाचा - महाविकासआघाडीला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करण्याची राज्यपालांना विनंती
राज्यातील सत्ता नाट्याच्या पार्श्वभूमीवर सत्तास्थापनेसाठी महाविकासआघाडीच्यावतीने राज्यपालांकडे दावा करण्यात आला आहे. त्याला उत्तर देताना आशिष शेलार यांनी विरोधकांवर आरोप केला आहे. शेलार म्हणाले, शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपला पागल असल्याचं म्हटलं होतं. आता विरोधकांची पागलपंती सुरू झाली आहे. काँग्रेसने विधिमंडळाचा पक्षनेता निवडला का नाही? राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार असून त्यांची राज्यपालांच्या पत्रावर सही नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये असंतुष्ट आमदारांचा भरणा असून त्यांनाच खूश ठेवण्यासाठी राज्यपालांना पत्र देण्याचे नाटक केल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.
राज्यपालांकडे सादर केलेल्या पत्रामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस गटनेता म्हणून अधिकृत कोणाची सही नाही. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेने सत्तास्थापनेचा दावा केला. मात्र, हा सत्तास्थापनेचा दावा नाही तर दिशाभूल करणारे पत्र आहे. अजित पवार यांना त्या पदावरून अजून काढले नाही. पक्षातील बंड थांबवण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे. विरोधकांची ही पागलपंती आहे. पक्षातील बंड थांबवण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे. नेता कोण? मुख्यमंत्री कोण? याचा उल्लेख नाही, असे आशिष शेलार यांनी सांगितले.