मुंबई - मुंबईसारख्या प्रदूषणाच्या शहरात अधिकाधिक वडाची झाडे लावली पाहिजेत व वाचवली पाहिजेत. त्यांचे संवर्धन होणे आवश्यक आहे. यासाठी यंदाच्या वटपौर्णिमेचे औचित्य साधून मुंबईत वडाच्या फांद्या कापण्यास बंदी घालावी. तसेच ज्याप्रमाणे होळीनिमित्त झाडे आणि फांद्या कापण्यास पालिका बंदी घालते व नियमभंग झाल्यास दंडात्मक कारवाई आणि तुरूंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. त्याच धर्तीवर वडाच्या फांद्या ( Banyan Tree ) कापल्यासही कारवाई करण्याबाबत पालिकेने निर्णय घ्यावा, अशी मागणी बृहन्मुंबई महानगरपालिका भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे ( BJP group leader Prabhakar Shinde ) यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल ( Municipal Commissioner Iqbal Singh Chahal ) यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
'झाडाची कत्तल वाचू शकेल' : येत्या १४ जून रोजी वटपौर्णिमा आहे. दरवर्षी वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाच्या फांद्याचा बाजारात अक्षरशः खच पडलेला असतो. अनेक घरांमध्ये या फांद्या आणून पूजन केले जाते. यावरून असे स्पष्ट दिसते की विक्रेते हजारो/लाखो वडाच्या फांद्या कापून त्या बाजारात विक्रीसाठी आणतात. दुर्देवाने दुसऱ्या दिवशी या सर्व फांद्या कचऱ्यात, गटारात, रस्त्यावर फेकून दिलेल्या आढळतात. वड हे वृक्ष संस्थेतील आणि पर्यावरणाच्या दृष्टीने खूप महत्वाचे झाड आहे. वडाची मुळं, पारंब्या जमिनीत खोलवर जातात. एक वड शेकडो वर्षे जगतो. त्यामुळे या झाडाला कुटुंब संस्थेचे प्रतीक मानले जाते. 'वसुधैवं कुटुंबकम्' असा उल्लेख करताना तिथे कायम वडाच्या झाडाचे चित्र दर्शवले जाते. वडाच्या झाडातून मोठ्या प्रमाणात प्राणवायू आपल्याला मिळतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, हिंदू धर्मात वडाचे पूजन शुभ मानले जाते. पत्नी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी या झाडाचे पूजन करते. त्यामुळे पालिकेने फांद्या कापण्यास बंदी घालताना महिलांना वट पूजनासाठी पर्याय देणे आवश्यक आहे. प्रत्येक विभागात जिथे मोठी वडाची झाडे असतील तिथे पालिकेने सार्वजनिक स्वच्छता ठेवून महिलांना या ठिकाणी पूजा करण्याचे आवाहन करावे. सध्या करोनाने पुन्हा डोके वर काढल्याने या ठिकाणी सॅनिटायझेशन करण्याचे आदेश प्रत्येक विभाग कार्यालयाला द्यावेत. पालिकेच्या या कृतीतून पर्यावरण रक्षण होईल, त्यासोबत एका महत्त्वाच्या झाडाची कत्तल वाचू शकेल, असे शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे.
'फांद्या खतासाठी पालिकेकडे सुपूर्द करा' : ज्या महिलांना बाहेर जाऊन पूजा करणे शक्य नसेल त्यांनी घरी आणलेली फांदी निदान खत निर्मितीसाठी वापरावी किंवा त्यापासून कुंडीमध्ये रोप तयार करावे आणि थोडे मोठे झाल्यावर ते पालिकेच्या नर्सरी मध्ये द्यावे. जे लोक फांद्या विकतात त्यांच्या राहिलेल्या फांद्या त्यांनी खतासाठी पालिकेकडे सुपूर्द कराव्या, असे आवाहनही शिंदे यांनी केले आहे.
हेही वाचा - Monsoon In Vidarbha : विदर्भात पावसाचे आगमन लांबणीवर; पुढील दोन दिवस Heat Wave चा हवामान विभागाचा इशारा