नवी मुंबई - ऐरोली खाडी परिसरात ठिकठीकाणी रुग्णालय, मेडिकल, लॅबमधील औषधांचा जैविक कचरा उघड्यावर टाकण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये कोरोना टेस्ट केलेल्या कांड्या, ज्यूस पावडर, हॅन्डग्लोज, इंजेक्शन सीरिंज अशाप्रकारच्या वापरलेल्या घातक जैविक कचऱ्याचा समावेश आहे. ऐरोलीतील 'विथ देम फॉर देम' या संघटनेने याचा खुलासा केला असून, प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन अशा लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होण्याची शक्यता
ऐरोली सेक्टर १९-२० परिसरातील खाडी किनारी अनेक ठिकाणी वापरलेल्या औषधांचा जैविक कचरा उघड्यावर टाकण्यात येत असल्याचे समोर आले आहे. किमान १ किलोमीटर पर्यंत हा कचरा पसरला आहे. शहरात सुक्या व ओल्या कचऱ्याच्या वर्गीकरणासह ई-कचरा व रुग्णालयातून जमा होणारा जैविक कचराही वेगळा करून देण्याबाबतचे धोरण पालिकेने आखले आहे. मात्र असे असतानाही या कोरोनाच्या महामारीत जैविक कचऱ्याचे ढीग थेट उघड्यावर टाकल्याने "विथ देम फॉर देम" या संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यालाही मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन, याबाबत नवी मुंबई महानगरपालिकेने अशा लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी 'विथ देम फॉर देम' संघटनेचे आशिष सावंत यांनी केली आहे.
पालिकेकडून अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई नाही
नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातील पालिका रुग्णालय आणि नोंदणीकृत इतर खासगी रुग्णालयातील जैववैद्यकीय कचरा अर्थात, बायोमेडिकल वेस्टची व्हिल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेची स्वतंत्र यंत्रणा आहे. मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या संस्थेला रुग्णालयातील जैविक कचरा नेऊन तांत्रिक पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्याचे काम देण्यात आले होते. जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावणे हे संबंधित खासगी रुग्णालय आणि त्या डॉक्टरांची जबाबदारी आहे. यासाठी पालिकेने ठरवून दिलेल्या संस्थेकडे त्यांनी हा कचरा देणे आवश्यक आहे. डॉक्टर वा रुग्णालयांनी जैविक कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकला तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. प्रसंगी क्लिनिक किंवा दवाखाना बंदही केला जाऊ शकतो. परंतु पालिकेकडून अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.
हेही वाचा - राज्यात आज नव्या 62 हजार 194 रुग्णांची नोंद; तर 853 रुग्णांचा मृत्यू