मुंबई - शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी देशभरात आज बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज बंद दरम्यान मुंबईकरांची दुसरी लाईफलाईन असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी नैतिक पाठिंबा देत बंदमध्ये न उतरण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही आज बेस्टच्या ८४ टक्के तर बेस्टच्या मदतीसाठी चालवल्या जाणाऱ्या एसटीच्या ३२ टक्के बस रस्त्यावर प्रवाशांची ने आण करण्यासाठी रस्त्यावर उतरवण्यात आल्या आहेत.
बंद का?
शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकरी दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत आहेत. गेले १२ दिवस शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची मागणी केली जात आहे. केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने देशभरात आज भारत बंद पाळला जात आहे. महाराष्ट्रातही सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आदी पक्षांनी बंदला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्यात आणि मुंबईत बंद यशस्वी होईल असा दावा या पक्षांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
किती बेस्ट कर्मचारी कामावर हजर -
सकाळी ८ वाजताच्या माहितीनुसार, भारत बंद दरम्यान बेस्टच्या ३४३५ पैकी २९१३ बसेस म्हणजेच ८४.८० टक्के बस रस्त्यावर उतरवण्यात आल्या आहेत. बेस्ट मध्ये काम करणाऱ्या ३३६७ पैकी २६६७नकंडक्टर (७९.२१ टक्के), ३११८ पैकी २३४९ ड्रायव्हर (७५.३४ टक्के), २१२ पैकी १५३ इंस्पेक्टर (७२.१७टक्के), २०९पैकी १०७ स्टार्टर (५१.२० टक्के) कामावर आले आहेत. बेस्टच्या मदतीला एसटीच्या गाड्या चालवल्या जात आहेत. एसटीच्या १०००पैकी ३२६ बसेस म्हणजेच ३२.६० टक्के गाड्या रस्त्यावर धावत आहेत.