मुंबई - भायखळ्यातील शाखेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ( 15 जुलै ) भेट दिली. भायखळ्यातील दोन शिवसैनिकांवर गुरुवारी रात्री हल्ला झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांची तक्रार न घेतल्याने शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी होती. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी भायखळ्यात जात शिवसैनिकांची विचारपूस केली. तसेच, जीवाशी येत असेल तर खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
शिवसेनच्या 39 आमदारांसोबत एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हाव लागलं. तर, एकनाथ शिंदे नवे मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्याने उद्धव ठाकरे पुन्हा सक्रीय झाले आहेत. प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी, शाखाप्रमुखांची ते आवर्जून भेट घेत आहे. त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे प्रयत्न करत आहेत.
पोलिसांनी घेतली नाही तक्रार - शिवसेना भवनावरील बैठक संपल्यानंतर उद्धव ठाकरेंनी भायखळा येथील रामभाऊ भोगले मार्गावर असलेल्या २०८ नंबरच्या शाखेला भेट दिली. यावेळी त्यांनी शिवसैनिकांची विचारपूस केली. भायखळा येथील शिवसेना पदाधिकारी बबन गावकर आणि विजय कामतेकर यांच्या गाडीवर काही जणांनी गुरुवारी रात्री हल्ला केला होता. यावेळी संबंधित पदाधिकाऱ्यांनी आपल्यावर ओढावलेली परिस्थिती सांगितली. तसेच, हल्ल्यानंतर आमची तक्रारही पोलिसांनी घेतली नाही, असं उद्धव ठाकरेंना म्हटलं.
'शिवसैनिक रक्षण करायला समर्थ' - उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही सगळे जण शिवसैनिकांना शांततेचं आवाहन करत आहे. मात्र, सध्या सुरु असलेलं राजकारण हे सूडाचं आहे. आम्ही हे राजकारण खपवून घेणार नाही. हल्ला झालेल्या शिवसैनिकांना तुम्ही सुरक्षा पुरवा. पोलिसांनी राजकारणात पडू नये. आमच्या राजकारणात तुम्ही लक्ष घालू नका. तुम्हाला जर जमत नसेल तर सांगा, हात वर करा, शिवसैनिक रक्षण करायला समर्थ आहे, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.
हेही वाचा - Vishwanath Bhoir : 'शिवसेना शहर प्रमुख मीच, निर्णय उद्धवजींचा...'; बंडखोर आमदाराने स्पष्ट केली भूमिका