मुंबई - पंतप्रधान मोदी यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिले वर्ष पूर्ण केले असून, सध्या देश कोरोनाशी झगडत आहे. मात्र, लॉकडाऊन संपल्यानंतर मोदी देशाला नक्की पुढे नेतील, असा विश्वास विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील पहिल्या वर्षात अनेक महत्वाचे निर्णय घेतले गेले. काश्मीरमधून 370 कलम हटवले. त्यानंतर त्यांच्यावर मोठी टीका झाली. काश्मीरमध्ये मोठा रक्तपात होईल अशी भीतीही काहीजणांनी व्यक्त केली होती. मात्र, असे काहीही झाले नाही. उलट तिथल्या सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात या निर्णयाने काही बदल आता दृष्टीपथात येत आहेत. त्याबरोबर नागरिकत्व सुधारणा कायद्यात बदल करून भारताच्या बाहेर राहणाऱ्या अल्पसंख्याकांनाही दिलासा मिळाला आहे. विरोधकांनी कितीही विरोध केला तरी जनतेने मोदी सरकारच्या निर्णयांचे स्वागतच केले असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.
देशात कित्येक वर्षे रेंगाळत राहिलेला राम मंदिराचा प्रश्नही आता निकाली निघाला आहे. न्यायालयीन प्रक्रियेने गंभीर प्रश्न सोडवता येतात, हे मोदी यांनी जगाला दाखवून दिले आहे. भारताच्या सुरक्षा व्यवस्थेत राफेल विमाने सरकारला याच कार्यकाळात प्राप्त झाली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. मात्र या स्तिथीलाही मोदी मोठ्या धैर्याने तोंड देत आहेत. लॉकडाऊनमुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेत बदल झाला हे निश्चित असले तरी त्यांनी सर्व समुदायासाठी 20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली असून त्याचा लाभ तळागाळातील लोकांनाही होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या काळात 80 कोटी लोकांना रेशन, विधवा आणि दिव्यांगांना मदत देण्यात आली आहे. शेतीसाठी 1 लाख कोटी छोट्या उद्योगांना 3 लाख कोटी रुपयांची मदत यात देण्यात आली आहे. त्याचबरोबर 120 देशांना भारताने हायड्रोक्लोरोक्वीन या औषधाचा पुरवठा केला. त्यामुळे जगात भारताचे कौतुक होत आहे. स्थलांतरित मजुरांसाठी जेवढ्या रेल्वे गाड्या मागितल्या तेवढ्या केंद्र सरकारने दिल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव देशात वाढत असताना सुरुवातीला पीपीई किट तयार होत नव्हते, आता दिवसाला 3 लाख पीपीई किट तयार होत आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. कठीण काळात मोदी यांचे नेतृत्व देशाला विकासाच्या मार्गावर घेऊन जाणारे आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले.