मुंबई : मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत ( Covid Patients Increased In Mumbai )असून, दररोज वीस हजार नव्या रुग्णांची नोंद होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेची आरोग्य यंत्रणा सुसज्ज झाली असून, मुंबईत नऊ ठिकाणी जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले ( BMC Covid Centre Beds ) आहेत. मात्र, असे असले तरी मुंबईतील काही खाजगी रुग्णालयातील कोविड बेड हाऊसफुल झाल्याचे सांगण्यात येत ( Private Hospitals Covid Bed Full Mumbai ) आहे. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने ही समस्या उद्भवली आहे.
रुग्णांचा खाजगी रुग्णालयांकडे कल
मुंबईत आढळणारे सुमारे ३० टक्के कोरोना रुग्ण हे उच्चभ्रू सोसायटीतील आहेत. त्यामुळे पालिकेच्या कोविड सेंटरकडे उपचारासाठी न जाता खाजगी रुग्णालयाकडे जाऊन उपचार घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते आहे. या पार्श्वभूमीवर खाजगी रुग्णालयांनी आपले ८० टक्के बेड हे कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करून द्यावेत आणि कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारण्यात येऊ नये, अशा सक्त सूचना महानगरपालिकेने ( BMC Instruct Private Hospitals ) दिल्या आहेत. अन्यथा साथरोग नियंत्रण कायदा १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महानगरपालिकेने दिला आहे.
लक्षणे नसलेल्या रुग्णांचा भरणा अधिक
नव्याने कोरोना बाधित होणाऱ्या रुग्णांमध्ये लक्षणे ( Covid Patient Symptoms ) असलेल्या रुग्णांची संख्या ही सुमारे ८० टक्के इतकी आहे. अशा रुग्णांना घरीच उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, ज्या रुग्णांना लक्षणे जाणवत आहेत अथवा ज्यांना सहव्याधी आहेत, अशा रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेतले जात आहे. मात्र, अशा रुग्णांची संख्याही अधिक असल्याने कित्येक रुग्णांना २४ तास प्रतीक्षा यादीत थांबावे लागत असल्याची माहिती हिंदुजा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी जॉय चक्रवर्ती यांनी दिली.
सौम्य लक्षणे असणाऱ्या कोरोना रुग्णांना समुपदेशन
दुसऱ्या लाटेच्या तुलनेत ( Covid Second Wave ) या लाटेमध्ये रुग्णांना अतिशय सौम्य लक्षणे जाणवत आहेत. ही सुदैवाची बाब आहे. यामुळे रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेण्याचा कालावधी कमी झाला असून, तीन दिवसानंतर रुग्णांना घरी उपचाराची परवानगी देण्यात येत आहे. यामुळे रूग्णालयावरचा ताण कमी होत असला तरीही, रुग्णांची संख्या पाहता आम्ही अधिक कक्ष कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले आहेत, अशी माहिती जसलोक रुग्णालयाचे जितेंद्र हरियाण यांनी दिली. तसेच सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना समुपदेशन करून घरी उपचार करण्याची आणि ऑनलाइन समुपदेशनाची व्यवस्था करून देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
मुंबईतील कोरोना रुग्णांसाठी असलेल्या बेडची उपलब्धता
महापालिकेच्या माहितीनुसार मुंबईत कोविड रुग्णांसाठी १६ हजार २०७ बेड उपलब्ध आहेत. या पैकी १४ हजार ४०० बेड रिक्त आहेत. आठ हजार २८७ ऑक्सीजन बेड उपलब्ध असून, त्यापैकी ७७९ बेड केवळ रुग्णांच्या उपचारासाठी घेतले आहेत. २२०४ अतिदक्षता बेडपैकी १६८० बेड रिक्त आहेत. तर १२८५ व्हेंटिलेटरपैकी ९१६ व्हेंटिलेटर रिक्त आहेत. सुमारे ६ हजार क्वारंटाईन बेडपैकी तीन हजार ११९ बेड रिक्त असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.