मुंबई : आर्थिक राजधानी मुंबईत सुरू असलेल्या पावसाच्या थैमानादरम्यान कांदिवलीच्या ठाकूर कॉम्प्लेक्समधील महानगरपालिकेच्या पार्किंग एरियात पाणी साठल्याने सुमारे 400 वाहने बुडाली आहेत. बुडालेल्या वाहनांमध्ये रिक्षांची संख्या सर्वाधिक असून अनेक दुचाकींचाही समावेश आहे. महापालिकेकडून पे अँड पार्क तत्वावर चालविल्या जाणाऱ्या पार्किंग एरियात बुडालेल्या वाहनांच्या मालकांकडून आता नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे.
स्थानिक नागरिकांचं असं म्हणणं आहे की, पे अँड पार्कची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. महानगरपालिकेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या अनुषंगाने बुडालेल्या वाहनांच्य नुकसानीची जबाबदारीही महानगरपालिकेने उचलायला हवी असे नुकसानग्रस्त वाहनांच्या मालकांचे म्हणणे आहे. या पे अँड पार्कमध्ये अनेक लक्झरी कार देखील पार्क केलेल्या होत्या. पार्क केलेल्या या लग्जरी गाड्यांना जलसमाधी मिळाली असून त्या पूर्णपणे खराब झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अग्निशमन दलाकडून पाणी उपसणे सुरू
पे अँड पार्क एरियात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले असून सध्या या ठिकाणी अग्निशमन दलाच्या मदतीने पाणी उपसण्याचे काम केले जात आहे. पार्किंग एरियातील संपूर्ण पाणी उपसल्यानंतरच येथे बुडालेली वाहने बाहेर काढता येणार आहे.
हेही वाचा - नियम तोडून धबधब्यावर गेलेल्या 117 पर्यटकांना पाण्याने वेढले, अग्निशामक दलाने केली सुटका