मुंबई - सोलापूर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांना युनेस्को-वार्की फाऊंडेशनचा जागतिक शिक्षक पुरस्कार (ग्लोबल टिचर प्राईज) जाहीर झाला आहे. याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी डिसले यांचे अभिनंदन केले आहे.
नावीन्यपूर्ण संकल्पना तसेच तंत्रज्ञानाची मदत घेऊन, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्याचे डिसले यांचे कार्य अनुकरणीय व कौतुकास्पद आहे, असे राज्यपालांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हटले आहे. ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी देखील डिसले यांचे अभिनंदन केले आहे. डिसले यांचे कार्य कौतुकास्पद आहे, त्यातून इतर शिक्षकांना प्रेरणा मिळत राहील असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. दरम्यान १४० देशातील १२ हजारांहून अधिक शिक्षकांच्या नामांकनातून डिसले यांना हा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.