मुंबई - अंधेरी येथील बॉम्बे केंब्रिज शाळेने आग प्रतिबंधक उपाय योजना केल्या नसल्याने शाळेची वीज आणि पाणी पालिकेने बंद केले आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान होत असल्याने ही शाळा लवकरात सुरू करावी, अशी मागणी पालिका आयुक्तांकडे केल्याची माहिती शिवसेनेचे आमदार अॅड. अनिल परब यांनी दिली. शाळेच्या ट्रस्टींनी केलेल्या चुकीची शिक्षा विद्यार्थ्यांना देण्यात येऊ नये, असेही परब म्हणाले.
अंधेरी जे. बी. नगर येथे बॉम्बे केंब्रिज ही शाळा गेले २६ वर्ष सुरू आहे. या शाळेने आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याने अग्निशमन दलाने नोटीस दिली होती. ३० दिवसात शाळेने आग प्रतिबंधक नियमांची पूर्तता करण्यास सांगितले होते. अग्निशमन नियमांची पूर्तता करण्याआधीच अग्निशमन दलाने पालिकेच्या मदतीने शाळा बंद केली आहे. यासंदर्भात पालकांना घेऊन परब यांनी पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना, या भेटी दरम्यान बॉम्बे केम्ब्रिज शाळा गेले २६ वर्ष सुरू असून नामांकित शाळा आहे. या शाळेने आग प्रतिबंधक कायद्याचे पालन केले नाही म्हणून शाळा बंद करण्याची नोटीस दिली. शाळेचे पाणी आणि वीज बंद केल्याने शाळा गेली ४ ते ५ दिवस बंद आहे. ही शाळा आणखी काही दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान होणार असल्याने आग प्रतिबंधक सुधारणा करुन शाळा लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी केल्याचे परब यांनी सांगितले.
याबाबत स्थायी समितीत भाजपचे नगरसेवक अभिजित सामंत यांनी मुद्दा उपस्थित केला होता. शाळेला मुंबई अग्निशमन दलाने नोटीस बजावली होती. या नोटीसचा कालावधी बाकी असतानाच अग्निशमन दलाकडून कारवाई करत पाणी आणि वीज कापल्याने शाळा बंद करण्याची वेळ आली आहे. या शाळेवर मुंबई अग्निशमन दलाकडून हेतू परस्पर कारवाई करण्यात आल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक अभिजित सामंत यांनी केला आहे. अशा प्रकारे शाळांवर कारवाई केली जात असल्यास त्या शाळेच्या बाजूला असलेल्या डी मार्ट आणि पंचतारांकित हॉटेलवर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न सामंत यांनी उपस्थित केला आहे. शाळा बंद केल्याने शाळेजवळ शिवसेनेनेही आंदोलन केले आहे.