मुंबई - पुण्यातील जात पंचायतीचे प्रकरण दुर्दैवी आहे. त्याची माहिती घेतली आहे. पोलीस योग्य ती कारवाई करतील, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. चैत्यभूमी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आले असता त्यांनी या विषयी प्रतिक्रिया दिली.
काय आहे प्रकरण?
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एका गावामध्ये रिटा कुंभार या महिलेस जात पंचायतीने बहिष्कृत करत एक लाख रुपये, पाच दारूच्या बाटल्या, पाच बोकड असा दंड करून एक प्रकारे खंडणी मागितल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर सर्व स्थरातून या प्रकरणाचे पडसाद उमटत आहेत. गृहमंत्र्यांनीही याची दखल घेतली असून हे दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.
प्रशासनाच्या आवाहनाला आंबेडकरी अनुयायांचा सकारात्मक प्रतिसाद
दरम्यान, कोरोनाच्या संकटकाळात प्रशासनाकडून जे आवाहन आंबेडकरी अनुयायांना करण्यात आले होते, त्याचे चांगल्या पद्धतीने पालन करण्यात आले आहे. कोरोना संकटात गर्दी होऊन कोरोनाचे संक्रमण होऊ नये, यासाठी हे आवाहन करण्यात आले होते. त्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याबद्दल देखमुख यांनी त्यांचे आभार मानले.