मुंबई - अॅमेझॉन प्राईम वरील तांडव या सिरीज वरून सुरु झालेल्या वाद आता उग्र रूप घेत असल्याचे दिसून येत आहे. आमदार राम कदम यांनी बांद्रा कुर्ला संकुल येथील पोलीस स्थानकातील सायबर शाखेत जाऊन अॅमेझॉन वरील तांडव सिरीज त्वरित बंद करण्याची मागणी केली. व यासोबतच साऱ्या देशाने अॅमेझॉन अॅप डिलीट करण्याचे सुद्धा आवाहन केले. व अॅमेझॉनने तात्काळ माफी मागावी, असे आवाहन केले. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी अॅमेझॉन अॅप बंद करण्याच्या घोषणा दिल्या.
मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र-
अॅमेझॉन प्राईमवर नुकतीच प्रदर्शित झालेली वेब मालिका तांडव वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या मालिकेमध्ये दाखवण्यात आलेल्या एका दृश्यामुळे हिंदू देव-देवतांचा अपमान झाला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावेळी तांडव वेब मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेता यांच्यावर कडक कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. तांडव या प्रदर्शित झालेल्या वेब मालिकेविरोधात भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले असून खासदार मनोज कोटक यांनीही केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून वेब मालिकेच्या निर्मात्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
ओटीटीसाठीही सेन्सॉरशीप असावी - भाजप
तांडव या वेबसिरिजला राज्यासह देशभरातून विरोध केला जात आहे. ओटीटीवर दाखविण्यात येणाऱ्या मालिकांमध्ये मोठ्याप्रमाणात अश्लीलपणा दाखवला जात आहे. इतकेच नाही तर देवी-देवतांबाबतही अक्षेपार्ह विधान केले जात आहे. यामुळे ओटीटीसाठीही सेन्सॉरशीप असावी, अशी मागणी मुंबई भाजपचे सचिव अॅड. ज्ञानमूर्ती शर्मा यांनी केली आहे.
हेही वाचा- राज्यातील ग्रामपंचायत निकाल जाहीर; निकालानंतर सर्वच पक्षांचा दावा