मुंबई - परदेशी दौरे करून आल्यावर शिवसेनेला शेतकऱ्यांची आठवण आल्याची टीका, राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी केली. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळवत आघाडीचाच मुख्यमंत्री होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २० वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने मुंबईत 'राष्ट्रवादी काँग्रेस दिंडी' काढण्यात आली आहे. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. काँग्रेस आणि आमच्यात कोणतेही गैरसमज नसून आता विधानसभा निवडणुकांकडे लक्ष केंद्रित करायचे आहे. निवडणुका येतात, जातात लोकसभेत मोदींना पाहून जनतेने मतदान केले. हा जनतेने दिलेला कौल आहे. मात्र, विधानसभेत ही परिस्थिती राहणार नाही. भाजपच्या बैठकीत राज्यात भाजपचा मुख्यमंत्री व्हावा, असे सांगितले आहे. मात्र, आम्हाला वाटते आघाडीचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. त्यामुळे समविचारी पक्षांना एकत्र घेऊन चालायचे आहे. त्यासाठी अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही पवार म्हणाले. लोकांनी आम्हाला 15 वर्षे निवडून दिले होते. त्यामुळे त्यांच्यासाठी जे-जे करता येईल ते सगळे आम्ही करणार आहोत.
राज्यात भयानक दुष्काळ आहे, त्यामुळे छावण्या बंद करू नये ही आमची मागणी आहे. दुसरीकडे बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत असून सत्ताधाऱ्यांना त्यावर ठोस पर्याय काढता आला नसल्याची टीकाही त्यांनी केली. पिकविम्याचे पैसे मिळाले नाही तर, आबडोळा करू, बघून घेईन ही भाषा सत्ताधाऱ्यांना शोभत नाही. ते विरोधात आहे की सत्ताधारी?, असा टोमणा त्यांनी शिवसेनेला लगावला.
राम मंदिराच्या मुद्यावरूनही अजित पवारांनी शिवसेनेवर निशाणा साधला. सेना लोकांना भुलवण्याचे काम करत आहे. भावनिक आणि हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेऊन जनाधार मिळवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी राम मंदिरावरून केलेल्या वक्तव्याचा दाखला देत सेना केवळ राजकारण करत असल्याचे पवार म्हणाले.