मुंबई- राज्यात अनेकांना सरकारच्या भविष्याबद्दल चिंता वाटत असते. परंतु सरकार चालविण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निश्चय केला आहे. त्यामुळे हे सरकार चालणारच आहे. त्यामुळे सरकारला भविष्यात कोणताही धोका नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून कामकाजाची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यता आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यातील महाविकास आघाडीचे मंत्री राज्यमंत्री उपस्थित हेाते.
अजित पवार काय म्हणाले?
अजित पवार म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे जनतेच्या विश्वासासाठी बांधील आहे. राज्याच्या समर्थ विकासासाठी आणि समान धागा ठेऊन कार्यक्रम सुरू आहे. शिवाय आम्ही राज्यतील जनतेच्या सुख दुःखात सहभागी होऊन निर्णय घेत आहोत. सरकार आल्यानंतर आमच्यावर अनेक संकटे आली. यामुळे जे प्रश्न आम्हाला सोडवायचे होते, ते सोडवता आले नाहीत, यामुळे काही प्रश्न राहिलेले आहेत, त्यातूनही लवकरच मार्ग काढला जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांचेही केले कौतूक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्याचा गौरव करताना पवार म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली जन माणसात प्रतिमा तयार केली आहे. सर्वच जण आज जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी चांगले काम करत आहेत. यामुळे पुढील चार वर्ष दमदार काम करण्यासाठी सर्वच जण कामाला लागले आहेत. पहिला अर्थसंकल्प आम्ही साडे चार लाख कोटींचा दिला. त्यातून बऱ्याच गोष्टी आम्हाला सोडवायच्या होत्या, परंतु त्यातील काही गोष्टी राहिल्या आहेत.
केंद्राकडून मदत नाहीच
आजमितीला केंद्राकडून जीएसटी आणि आणि इतर करांच्या माध्यमातून हजारो कोटी रूपयांचा निधी येणे बाकी आहे. अशा स्थितीतही आम्ही राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सामाजिक बांधीलकी जपून असल्याचेही त्यांनी सांगितले. आम्ही सत्तेवर आल्यानंतर कोरोनाचे संकट आले, पण आम्ही डगमगलो नाही. या संकटातून जनतेला सावरण्यासाठी सगळ्याच विभागाने काम केले. अनेक सहकाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता काम केले. या काळात अनेकांनी सरकार पडेल म्हणून समोरच्या लोकांनी गाजर दाखवण्याचे काम केले. परंतु ते यशस्वी होऊ शकले नसल्याचे अजित पवार म्हणाले. मुख्यमंत्र्यांचा आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा कोरोनाच्या काळात त्यांचा इतका अभ्यास झाला आहे, ते एक प्रकारचे डॉक्टर झाले आहेत. आम्हाला कोरोना झाला पण त्यांना कोरोना घाबरतो, असे मिश्कीलपणे सांगितले.