मुंबई - अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेते प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उर्मिला मातोंडकर यांनी हिंदुत्त्व, सेक्युलरिजम, बॉलिवूड, कंगना रणौत तसेच त्यांच्या विधानपरिषदेवरील जागेवर भाष्य केले.
जन्माने आणि कर्माने हिंदू असल्याचे सांगत हिंदू हा सर्वात जास्त सर्वसमावेशक आणि सहिष्णू धर्म असल्याचे वक्तव्य अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी केले आहे. शिवसेनेत पक्षप्रवेश झाल्यानंतर त्यांना काँग्रेस सोडण्याबाबत प्रश्न विचारण्यात आले. यावेळी काँग्रेस सोडण्यामागील मुख्य कारण विधानपरिषदेतील उमेदवारी नाकारल्याचे नव्हते, हे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मी काँग्रेस सोडताना राजकारण सोडीन, असे म्हणाले नसल्याचे उर्मिलाने अधोरेखित केले.
सेनेत प्रवेशासाठी कोणताही दबाव नाही
मी काँग्रेस चौदा महिन्यांपूर्वीच सोडली होती. माझी कोणावरही नाराजी अथवा वैर नव्हते. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात देखील 'बेहेतरीन लीडर' आहेत. मात्र पक्षांतर्गत अन्य कारणांमुळे मला काँग्रेस सोडावी लागली. यानंतर शिवसेनेत प्रवेश करताना माझ्यावर कोणताही राजकीय दबाव नव्हता. मी मराठी मुलगी आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे स्थान आजही मराठी माणसाच्या मनात सर्वोच्च ठिकाणी आहे. शिवसेनेचा महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचा निर्धार! आणि मी त्या प्रवाहात उतरले आहे, असे उर्मिलाने म्हटले.
महाविकास आघाडीचे काम जबरदस्त
कोविडच्या काळातही महाविकास आघाडी सरकारने मोठ्या हिंमतीने जबाबदारी सांभाळत जबरदस्त काम केले आहे, असे उर्मिला म्हणाल्या. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सर्वच नेत्यांनी वाखाणण्याजोगी कामगिरी केल्याचे त्यांनी सांगितले. कोविड काळातील ही दमदार कामगिरी पाहूनच मी शिवसेचे सदस्यत्व स्वीकारत आहे. मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. मात्र, विधानपरिषदेसाठी सेनेकडून माझ्या नावाची चर्चा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शिवसैनिक म्हणून सदैव कार्यरत असणार आहे, असे उर्मिलाने म्हटले.
"बॉलिवूडला बदनाम करण्याचं काही जणांचं कारस्थान"
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नोएडामध्ये बॉलिवूड शिफ्ट करण्याचा विचार करत आहेत. उत्तर प्रदेशात हिंदी सिनेमे बनावे, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. यासाठी योगी उद्या मुंबईत येऊन काही कलाकारांच्या भेटीगाठी घेणार आहेत. या मुद्द्यावर बोलताना उर्मिला मातोंडकरने 'मुंबईच्या रक्ताचं बॉलिवूड' असल्याचं म्हटलंय. मुंबईवर आपला हक्क असून मोजक्या लोकांमुळे बॉलिवूड बदनाम होत असल्याची टीका तिने केली. याचसोबत बॉलिवूडसाठी कोणत्याही परिस्थिती उभी राहीन, असे त्या म्हणाल्या. कंगना रणौतच्या मुद्द्याला बगल देत, या विषयावर आतापर्यंत खूप बोलून झालंय, असे त्यांनी म्हटले.