मुंबई - मुंबईत गेल्या अकरा महिन्यांच्या उपाययोजनांनंतर कोरोना आटोक्यात आला. मात्र, रेल्वेतील प्रवासी आणि गर्दीच्या ठिकाणी नागरिक मास्क वापरत नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे मुंबईत कोरोना पुन्हा डोके वर काढण्याच्या मार्गावर आहे. त्यासाठी रेल्वे प्रवासात मास्क न वापरणाऱ्याविरोधात पालिकेने कठोर पावले उचलण्याचे ठरविले आहे. लोकलमध्ये प्रवास करताना मास्कचा वापर न करणाऱ्या प्रवाशांविरोधात कारवाई करण्यासाठी विशेष मार्शल नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनासंदर्भात आढावा बैठक -
मुंबईत लॉकडाउनमध्ये शिथीलता दिल्यानंतर अनेक ठिकाणी गर्दी वाढू लागली. लोकल ट्रेनचा प्रवास खुला झाल्यानंतर गर्दीत आणखी वाढ झाली. त्यामुळे शहरात कोरोनाचा प्रसार वाढण्याची भीतीही निर्माण झाली आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा पोलीस प्रमुख, टास्क फोर्सचे सदस्य आदींशी संवाद साधला. यावेळी कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपायांचा आढावा घेण्यात आला.
रेल्वे प्रवाशांवर कारवाई -
मुंबईत लोकल प्रवासात अनेक प्रवाशांकडून मास्क वापरला जात नसल्यास त्यांच्यावर कारवाईसाठी पालिकेने कठोर पाऊल उचलण्याचे ठरविले आहे. त्यासाठी लोकल प्रवासात मार्शल नियुक्त करून कारवाई केली जाणार आहे. याबाबत, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दुजोरा दिला. सध्या लोकल स्थानकांवरदेखील मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात आहे. मात्र, लोकलमध्ये प्रवासी मास्क वापरत नसल्यास ते समजने अवघड होते. मात्र आता पालिकेने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम, मध्य, हार्बर अशा सर्वच मार्गावरील लोकलमध्ये ही कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी क्लिनअप मार्शल तसेच आरपीएफ, रेल्वे पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बल आदी यंत्रणांची मदत घेतली जाणार आहे.
हेही वाचा - वादाच्या प्रकरणांनंतर 'या' नेत्यांना द्यावा लागला होता राजीनामा