मुंबई - दबावाखाली न येता अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालिकेला दिले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईत अविघ्न पार्क इमारतीला आग लागली. यामुळे अनधिकृत बांधकामांवरील कारवाई आणखी तीव्र करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी 'आरईटीएमएस' हे पोर्टल अद्यावत करण्यात येणार आहे. कारवाईसाठी सहाय्यक आयुक्तांना सक्षम करण्यात येणार आहे. तसेच कारवाई करताना विविध सरकारी यंत्रणांमध्ये समन्वय साधला जाणार असल्याचे पालिका अधिकाऱ्याने दिली.
कारवाईसाठी पोर्टल -
मुंबईत मागील काही वर्षापासून मोकळ्या जागांवर बांधकामे उभी राहत असून यात अनेक प्रकारची अवैध बांधकामे केली जात आहेत. या बांधकामांवर पूर्वी पालिका मुख्यालयातील अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत कारवाईचा बडगा उगारला जात होता. मात्र काही वर्षांपूर्वी हे अधिकार विभाग कार्यालयांना तसेच कारवाईसाठी नेमलेल्या पदनिर्देशित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. विस्तारलेल्या आणि दाटीवाटीची वस्ती असलेल्या मुंबईतील प्रत्येक अनधिकृत बांधकामांपर्यंत प्रशासनाला पोहोचणे शक्य होत नाही. त्यामुळे नागरिकांना तक्रार करण्य़ासाठी अवैध बांधकामे कारवाई व्यवस्थापन विभाग (आरईटीएमएस) हे पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलवर नागरिकांनी केलेल्या तक्रारींचा शोध, तपास आणि प्रत्यक्ष कारवाई केली जाते. तक्रार दाखल झाल्यानंतर कारवाईच्या कोणत्या टप्प्यावर आहे, ही माहिती अद्यावत केली जाते. हे पोर्टल आणखी अद्यावत केले जात असून त्याचे काम सध्या ५० टक्के पूर्ण झाले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना सहजपणे हे पोर्टल हाताळता येणार आहे, अशी माहिती पालिकेच्या संबंधित विभागातील अधिकाऱ्य़ाने दिली.
हे ही वाचा - Aryan Khan Case -आर्यनच्या सुटकेसाठी 25 कोटींचा सौदा, ड्रग्ज पार्टी प्रकरणातील 'पंच'चा गौप्यस्फोट
जीआयएस एरियल सर्वेक्षण -
अवैध बांधकामांना चाप लावण्यासाठी 'जीआयएस एरियल सर्वेक्षण' पालिकेकडून केले जाणार आहे. त्यामुळे भूमाफिया, विकासक तसेच झोपडीदादा यांच्या बेकायदा कृत्य, मनमानीला आळा बसेल. या कामासाठी पालिकेने सल्लागार नेमला आहे. या आधुनिक तंत्रज्ञानात शहरातील प्रत्येक घर, जागा, इमारती, खाडी, समुद्र, नद्या, वन आदींची उपग्रहाच्या माध्यमातून छायाचित्रे काढली जाणार आहेत. दर सहा महिन्यांनी या माहितीचा पुन्हा आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे बांधकामांत झालेले बदल शोधून काढणे सोपे जाणार आहे.
सहाय्यक आयुक्तांना करणार सक्षम -
विभागातील अवैध बांधकामांवर सहाय्यक आयुक्तांकडून कारवाई अपेक्षित असते. पावसाळी नियोजनासह इतर कामाचा ताण असल्याने त्यांना अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी पाहिजे तितका वेळ देता येत नाही. त्यामुळे आगामी काळात सहाय्यक आयुक्तांना आणखी सक्षम करण्याचा विचार पालिकेकडून केला जातो आहे.