मुंबई : संगीत क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या टी-सीरिजचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. एका 30 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
कामाचे आश्वासन देऊन बलात्कार
मुंबईतील डीएन नगर पोलीस ठाण्यात भूषण कुमार यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. एका 30 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार भूषण कुमार यांनी तिला टी-सीरिजच्या एका प्रोजेक्टमध्ये काम देण्याचे आश्वासन देऊन तिच्यावर बलात्कार केला. कुमार यांनी आपली फसवणूक केल्यामुळेच आपण पोलिसांत तक्रार दाखल केल्याचे महिलेने म्हटले आहे. पोलिसांनी यावरून भूषण कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कलम 376 नुसार गुन्हा दाखल
महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी कुमार यांच्याविरोधात भादंवि कलम 376, 420 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे. दरम्यान, या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक झालेली नाही.
कोण आहेत भूषण कुमार?
भूषण कुमार हे बॉलीवूडमधील प्रसिद्ध संगीत व चित्रपट निर्माते असून ते टी-सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार यांचे पुत्र आहेत. सध्या ते टी-सीरिजचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मितीही केली आहे.
#metoo मोहिमेदरम्यानही कुमार यांच्यावर झाले होते आरोप, पत्नीने केली होती पाठराखण
2018 मध्ये बॉलीवूडमध्ये सुरू झालेल्या #metoo मोहिमेदरम्यानही भूषण कुमार यांच्यावर एका महिलेने लैंगिक छळवणुकीचे आरोप केले होते. "आपण बॉससोबत झोपण्यास नकार दिला म्हणून आपल्याला चित्रपट क्षेत्रातून बाहेर काढण्यात आले" असा दावा करत एका अज्ञात महिलेने ट्विटरवरून कुमार यांच्यावर आरोप केले होते. यावेळी कुमार यांची पत्नी दिव्या खोसला कुमार हीने पती भूषण कुमार यांची पाठराखण केली होती. "माझे पती भूषण कुमार यांनी अतिशय मेहनतीने टी-सीरिजला इथपर्यंत पोहोचवले आहे. भगवान श्रीकृष्ण यांच्याविरोधातही काही लोकांनी आरोप केले होते. #metoo ही मोहिम समाजातील वाईटाच्या सफाईसाठी असली तरी काही लोक तिचा गैरवापर करत आहेत" असे दिव्याने तेव्हा म्हटले होते.
हेही वाचा - Gulshan Kumar Murder अब्दुल रौफची जन्मठेप कायम, राशिदची मात्र मुक्तता