मुंबई - वर्सोवा परिसरात 17 वर्षीय अल्पवयीन मोलकरणीसोबत गैरवर्तन केल्याची घटना (Minor Maid Beaten Brutally in Versova ) समोर आली आहे. वर्सोवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विघ्नेश्वर हाईट्स अंधेरी पश्चिम परिसरात वास्तव्याला आहे. सोमवारी रात्री जेव्हा मोलकरणीला तिचे काम पूर्ण करण्यास उशीर झाला. तेव्हा आरोपीने तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. तिला स्वत:चे कपडे काढण्यास भाग पाडले आणि नंतर तिचे व्हिडिओ आणि फोटो काढले. आरोपीने पीडितेला चप्पलने मारले ज्यामुळे पीडितेच्या डोक्याला जखमा झाल्या.
घरी गेल्यावर पीडित अल्पवयीन मुलीच्या बहिणीला तिच्या अंगावर जखमेच्या खुणा दिसल्या तेव्हा तिने याबाबत विचारणा केली असता पीडितेने घडलेला प्रकार सांगितला. घटनेनंतर पीडितेने जवळचे पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.
आरोपी महिलेला मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती होती. तरीही तिला कामावर ठेवले. पीडित महिला गेल्या चार महिन्यांपासून आरोपी महिलेच्या घरी काम करत होती. आरोपी महिला पीडितेला अनेकदा मारहाण करत असे, पोलिसांनी सांगितले.
पीडित मुलीच्या वक्तव्याच्या आधारे वर्सोवा पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात भादंवि कलम 326,354 (बी), 504 आयपीसी आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपी महिलेला अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता आरोपी महिलेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.