मुंबई - हवामान खात्याने तौते वादळासंदर्भात यलो अलर्ट जाहीर केला आहे. या अनुषंगाने मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. समुद्रकिनारी आणि समुद्र किनाऱ्यालगतच्या विभागात विशेष काळजी घेतली जात आहे. समुद्र किनारी ९३ लाइफगार्डची नियुक्ती करण्यात आली आहे. समुद्र किनाऱ्याजवळ तसेच चौपाट्याजवळच्या मुंबई अग्निशामक दलाच्या केंद्रांना अलर्टवर ठेवण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मुंबई महापालिका सज्ज -
कोकण किनारपट्टीवर शनिवारपासून 'तौक्ते' चक्रीवादळ धडकणार असून १६ आणि १७ मे रोजी मुंबईच्या किनारपट्टीवरही जोरदार वारे वाहणार आहेत. यातच काही ठिकाणी पाऊस आणि ताशी ७० किमी वेगाने वारे वाहणार असल्यामुळे मुंबईत 'यलो अलर्ट' जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने गिरगाव, दादर, जुहू, अकसा, मार्वे आदी समुद्रकिनारी ९३ लाइफगार्डची नियुक्ती केली आहे. या लाईफगार्ड्सना दोरखंड, माईक, जेटस्की बोटी देण्यात आल्या आहेत. नरिमन पॉइंट, नाना चौक, दादर, अंधेरी, मालाड, बोरिवली या मुंबई अग्निशामक दलाच्या केंद्रांवर जवानांना दोरखंड, बोटीसह अलर्ट राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सतर्क व सुसज्ज -
मुंबई महानगरपालिकेची आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सुसज्ज व सतर्क असून या यंत्रणेस हवामान खात्याकडून प्राप्त अंदाज व चक्रीवादळाबाबतच्या सूचना व सतर्कतेचे संदेश सर्व संबंधितांना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आवश्यकतेनुसार नौदल, तटरक्षक दल, थलसेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकांची मदत आवश्यकतेनुसार उपलब्ध करुन घेण्याच्या दृष्टीने समन्वय साधण्याची कार्यवाही देखील आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात येत आहे.
'एनडीआरएफ'ची मदत घेणार -
वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आणि एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास गरज भासल्यास 'एनडीआरएफ'सह पोलीस, नेव्ही, कोस्टल विभागाकडून मदत घेतली जाईल, अशी माहिती उपप्रमुख अग्निशामक अधिकारी हेमंत परब यांनी दिली.