मुंबई - कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे लॉकडाऊनचे निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र तरीही मोठ्या प्रमाणात लोक नियमांचे उल्लंघन करत आहेत. अशा व्यक्तींच्या विरोधात मुंबई पोलिसांनी कडक कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे. गेल्या चोवीस तासात मुंबई शहरातील वेगवेगळ्या परिसरामध्ये 495 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, यामध्ये 7 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
आतापर्यंत पोलिसांनी 288 आरोपींना नोटीस देऊन सोडले असून, 183 आरोपींना अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली आहे. 188 कलमांतर्गत मुंबई पोलिसांनी 98 वाहने जप्त केलेली असून, मुंबई पोलिसांकडून कलर कोडचे नियम वाहनांवर लादण्यात आल्यानंतर स्टिकर न लावणाऱ्या 48 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या 24 तासात मुंबईतील दक्षिण, मध्य, पूर्व ,पश्चिम, उत्तर परिसरात 208 गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत. तर दक्षिण मुंबईत 51 गुन्हे, मध्य मुंबईत 9 गुन्हे, पूर्व मुंबईत 31 गुन्हे, पश्चिम मुंबईत 103, उत्तर मुंबई 14 गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत. 188 च्या अंतर्गत दक्षिण मुंबईत 112 आरोपींवर गुन्हे दाखल झाले असून मध्य मुंबईत 9 आरोपींवर गुन्हे दाखल झालेले आहेत. पूर्व मुंबई 60, पश्चिम मुंबई 267, तर उत्तर मुंबईमध्ये 47 आरोपींवर कलम 188 च्या अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत.
कलम 188 च्या अंतर्गत दक्षिण मुंबईमध्ये 78 तर, पूर्व मुंबईत 20 वाहने जप्त करण्यात आली आहेत. मुंबई पोलिसांनी रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांना कलर कोडचे नियम लादले आहेत. यासंदर्भात स्टिकर न लावणाऱ्या व विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये दक्षिण मुंबईत तब्बल 48 वाहनांवर स्टिकर न लावता अनावश्यक रस्त्यावर वाहन आणल्याच्या संदर्भात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.