मुंबई - अकरावी प्रवेशासाठीची CET हायकोर्टाकडून रद्द करण्यात आली आहे. 28 मे चा यासंदर्भातला अध्यादेश हायकोर्टानं रद्द केला आहे. अकरावीचे प्रवेश दहावीच्या गुणांनुसारच करावेत, असे हायकोर्टाने सांगितले आहे. राज्य सरकारनं निकालाला स्थगिती देण्याची याचिका केली होती. ही याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे. मुंबई हायकोर्टात राज्य सरकारतर्फे आशुतोष कुंभकोणी यांनी बाजू मांडली.
हेही वाचा - अकरावीचे प्रवेश होणार कधी? विद्यार्थ्यांसह शिक्षकही संभ्रमात
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावीचा निकाल 16 जुलै रोजी जाहीर केला. मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या प्रतित्रापत्रानुसार राज्यात अकरावीसाठी सामाईक प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येणार होती. या परीक्षेसाठी मंडळाच्यावतीनं पोर्टल तयार करण्यात आले. सीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत 2 ऑगस्टपर्यंत देण्यात आली होती.
मूल्यांकनाच्या आधारेच दहावीचे निकाल केले होते जाहीर -
कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारेच विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केले होते. सर्व मंडळांची गुणांकनाची पद्धत एकसारखी नाही आणि मुंबई व अन्य शहरांतील प्रसिद्ध कॉलेजांमधील अकरावीच्या प्रवेशासाठी सर्वच मंडळांच्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र स्पर्धा असते, हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत सीईटी चाचणी घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होते. त्याबाबतचा २८ मे रोजी जीआर काढला होता.
हेही वाचा - 11th Admission 2021 : विद्यार्थ्यांनो, अशी असणार अकरावीची प्रवेश प्रक्रिया!
हायकोर्टाने दिलेल्या निकालाचा अभ्यास करणार - शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
२८ मे २०२१ रोजीचा सरकारचा अध्यादेश हायकोर्टाकडून रद्द करण्यात आला आहे. याबाबतीतले निकष तपासून पुढील निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोर्टाच्या निकालाचा आम्ही अभ्यास करू, कोर्टाने दिलेल्या निकालाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. निकालाचे पत्र आम्हाला आले नाही. पत्र येताच यावर आम्ही बोलू, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणार आहोत. प्रत्येक विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळणार आहे, असेही त्या म्हणाल्या.