कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक पार पडली. यामध्ये सत्ताधारी मुश्रीफ गटानेच पुन्हा बाजी मारली. आज (गुरुवारी) जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदाची निवड होणार आहे. मात्र यामध्ये शिवसेना नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. याच दरम्यान शिवसेनेचे नेतृत्व करणाऱ्या खासदार संजय मंडलिक यांनी आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली. सेनेचा सन्मान व्हावा, अशी इच्छा असून ती नेहमी असेल. शिवाय आरोग्यराज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर आणि निवेदिता माने या सेनेसोबतच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
- 'आमच्याकडे अध्यक्ष पदासाठी संख्याबळ नाही मात्र...'
यावेळी बोलताना संजय मंडलिक म्हणाले, आमच्याकडे अध्यक्ष पदासाठी आवश्यक असणारे संख्याबळ नाही आहे. एकूण 5 संचालक शिवसेनेचे आहेत. या निवडणुकीत किमान 12 संचालकांची गरज आहे. मात्र आमच्या एका पक्षाचे 5 संचालक असल्याने आमचा सन्मान व्हावा ही ईच्छा असून यापुढेही असणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिवाय वरिष्ठांनी 3 वाजेपर्यंत वाट पाहण्याचे आदेश दिले असून त्यानंतर जे आदेश मिळतील तशी भूमिका आम्ही घेणार असल्याचेही मंडलिक यांनी म्हटले. दरम्यान, निवडणुकीपूर्वी बिनविरोध करताना 3 जागेची शिवसेनेने मागणी केली होती. मात्र सत्ताधाऱ्यांनी 3 जागा दिल्या नसल्याने शिवसेना सत्ताधाऱ्यांपासून वेगळी झाली आणि निवडणूक लढवून तीन जागांवर सेनेने विजय मिळवला. त्यामुळे आता पुन्हा एकदा सन्मान व्हावा अशी मंडलिक यांची भूमिका असून उपाध्यक्ष पद तरी शिवसेनेला मिळते का हेच पाहावे लागणार आहे.
- विश्रामगृहात बैठक
दरम्यान, सत्ताधारी गटाची येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक सुरू झाली आहे. यामध्ये ग्रामविकास हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार विनय कोरे, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार राजीव आवळे, आदी संचालकांसह निवडणुकीत सत्ताधाऱ्यांसोबत राहिलेले आरोग्यराज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर आणि निवेदिता माने सुद्धा या बैठकीत सहभागी झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
हेही वाचा - औरंगाबाद: लाडगाव जिल्हा परिषद शाळेतील 7 शिक्षक पॉझिटिव्ह