कोल्हापूर - संभाजीराजे छत्रपती ( sambhaji raje chhatrapati ) आणि माझी मागील काही दिवसांत काहीही राजकीय चर्चा झाली नाहीये. मात्र काँग्रेसच काय कोणत्याही पक्षातील नेत्यांना संभाजीराजे छत्रपती आपल्या पक्षासोबत यावेत असे वाटेल आणि त्यात वाईट काहीच नाही असे काँग्रेस नेते तथा पालकमंत्री सतेज पाटील ( satej patil on sambhaji raje in Kolhapur) यांनी म्हटले आहे.
संभाजीराजे यांच्या कॉंग्रेस प्रवेशाच्या चर्चेला उधाण - संभाजीराजे छत्रपती यांच्या खासदारकीचा कार्यकाळ 3 मे रोजी संपला. त्यामुळे आपली पुढची भूमिका वेगळी असेल असे त्यांनी यापूर्वी म्हटले होते. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. याच पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देत त्यांची जी काही भूमीका असेल त्याला आमच्या शुभेच्छा असतील असेही म्हटले. त्यामुळे राजकीय वर्तुळात संभाजी राजे हे कॉंग्रेसमध्ये करणार का? या चर्चेला मोठ्या प्रमाणात उधाण आले आहे.
संभाजी राजे यांचा कॉंग्रेस प्रवेश? - खासदार संभाजीराजे हे छत्रपती घराण्यातील आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या पक्षात प्रवेश करावा, असे प्रत्येकच राजकीय पक्षाला वाटते. पण त्यांच्याशी राजकीय चर्चा झाली नसल्याचे सतेज पाटील यांनी स्पष्ट केले. मराठा आंदोलन, आरक्षण, सारथी अशा विविध प्रश्नांवर चर्चा झाली. ते छत्रपतींच्या घराण्यातील असल्याने ते आपल्या पक्षात यावेत, असे वाटण्यात गैर काहीच नाही, असे पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते. त्यानंतर ३ दिवसातच संभाजीराजे यांनी मोठा निर्णय घेतला असून त्याची घोषणा ते १२ मे रोजी पुण्यातून करणार आहेत, अशी माहिती मिळत आहे.
मालोजीराजेंचा मागील निवडणुकीत आम्हाला निश्चित फायदा झाला - दरम्यान, संभाजीराजे यांचे बंधू मालोजीराजे सुद्धा नुकत्याच पार पडलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय दिसले. त्यामुळे त्यावेळी याबाबत काही चर्चा झाली होती का विचारले असता सतेज पाटील म्हणाले, मालोजीराजे हे पूर्वी काँग्रेसचे आमदार होते. त्यांनी पाच वर्षांच्या कार्यकाळात अतिशय चांगले काम केले होते. त्यामुळे त्यांना मी विनंती केली होती. शिवाय त्यांचा पेठांमध्ये चांगला जनसंपर्क आहे. त्यानुसार ते प्रचारात सक्रिय झाले त्याचा आम्हाला निश्चितच मोठा फायदा झाल्याचेही सतेज पाटील म्हणाले.