कोल्हापूर - मी आमदार होणार हे मला शंभर टक्के माहीत आहे. तेवढा आत्मविश्वास मला असून कार्यकर्ते सुद्धा माझ्या पाठीमागे आहेत. कार्यकर्त्यांनी आणि जनतेनेच मला आता तेवढे उचलून धरले आहे. आज इचलकरंजी दहा वर्षे मागे गेली याची चर्चा आहे. ती दुरुस्त करायची असेल तर त्यांना प्रकाश आवाडेच पाहिजे असा ठाम निर्णय लोकांनी घेतला असल्याचा विश्वास प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा आणि सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा देत असल्याचे सांगण्यासाठी आणि आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पत्रकार परिषदेत प्रकाश आवाडे यांनी आपली भूमिका मांडत असताना कलम 370 आणि कलम 35 अ रद्द करण्याचा धाडसी निर्णय भाजपने घेतला याचा आनंद होत असल्याचे सांगितले. जे काँग्रेसने अनेक वर्षांपूर्वी करायला पाहिजे होते. ते शक्य झाले नव्हते तो निर्णय भाजपने घेतला. त्या निर्णयाचे मी स्वागत केले होते. या विषयावरची मतमतांतरे वाढायला लागली. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे असे विषय पक्षात राहून वेगवेगळ्या विचाराने काम करणे खूप अवघड असल्याची जाणीव मला झाली. त्यामुळे मी जिल्हाध्यक्ष असल्यामुळे मला माझी मतं स्पष्टपणे मांडता आली पाहिजेत पण, पक्षीय बंधने त्याला आडवी येऊ लागल्याचे मला जाणवायला लागले म्हणून त्यातून मुक्त होण्याचा निर्णय घेतल्याचे आवाडे यांनी सांगितले.
कलम 370 आणि 35 अ निर्णयाने इचलकरंजीकरांचे पोट भरणार का? इचलकरंजीकरांना विकास हवा आहे. शिवाय आपण यापूर्वी नोटांबंदी आणि अनेक भाजपच्या निर्णयांचा विरोध केला होता. मात्र, आता स्वतंत्र लढून इचलकरंजीचा विकास कसा साधणार असे विचारल्यानंतर ते म्हणाले, सध्याच्या परिस्थितीमध्ये इचलकरंजीच्या विकासाचा मुद्दा काढला तो अत्यंत महत्त्वाचा आहे. इचलकरंजीचे चांगले व्हावे, इचलकरंजी पुन्हा ट्रॅकवर यावी आणि जगाच्या पाठीवर नंबर एकचे औद्योगिक शहर बनावे हीच माझी स्वतःची भावना आहे. त्यामुळे आता जनतेचाच आग्रह आहे की, प्रकाश आवाडेच आमदार झाले पाहिजेत. आवाडे आमदार व्हायला हवे असतील तर कुठल्याही पक्षाचा बॅनर नको आम्ही त्यांच्या पाठीशी राहू अशा पद्धतीची युवकांची मागणी सुद्धा असल्याचे त्यांनी सांगितले.