कोल्हापूर - लोकसभा निवडणुकांच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी २२ ते २४ मे या कालावधीत उपमहापौर भूपाल शेटे यांच्यासह अनेक आजी-माजी नगरसेवकांना शहर आणि करवीर तालुक्यात प्रवेशबंदी केली आहे. याबाबतच्या नोटिसा पोलिसांनी बजावल्या आहेत. निकालानंतर कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, म्हणून पोलीस प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. पोलिसांनी सूडबुद्धीने नोटिसा पाठवल्या असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. याप्रकरणी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे संबंधितांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणूक कालावधीत तुमच्या हालचाली आणि कारवायांमुळे सामाजिक स्वास्थ्य, सुरक्षिततेस धोका पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच तुमच्या उपस्थितीमुळे आणि कारवायांमुळे परिसरात सार्वजनिक शांतता भंग होऊ शकते. त्यानुसार तुम्हाला ‘कारणे दाखवा’ नोटीस देण्यात येत आहे. २२ मे रात्री बारा वाजल्यापासून २४ मे रात्री बारा या कालावधीत कोल्हापूर शहर आणि करवीर तालुका कार्यक्षेत्रात प्रत्यक्ष प्रवेश करू नये अथवा थांबू नये. कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक शांतता भंग करू नये, यासाठी काही खुलासा द्यावयाचा झाल्यास २१ मे किंवा त्यापूर्वी कार्यालयात समक्ष उपस्थित राहून लेखी खुलासा द्यावा. मुदतीत खुलासा न दिल्यास तुम्हाला काहीही खुलासा द्यावयाचा नाही, असे गृहीत धरून तुमच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही या नोटीसमध्ये म्हटले आहे.
बहुतांश नगरसेवकांवर कोणताही गुन्हा दाखल नाही, तरीही त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात येत असल्याने संतप्त भावना व्यक्त होत आहेत.