कोल्हापूर - मराठा आरक्षण प्रश्नावरून संभाजीराजे आता पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. आरक्षण प्रश्नी राज्य सरकारने आश्वासन दिले होते, त्यानंतर काहीही केले नाही. तसेच सारथी सोडले तर इतर प्रश्नांकडे त्यांनी काहीही पाठपुरावा केला नाही आहे. त्यामुळेच आता रायगडपासून पुन्हा एकदा राज्याचा दौरा सुरू करणार असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.
25 ऑक्टोबरपासून राज्य दौरा
सरकारला अल्टिमेटम दिले होते, मात्र त्यानंतर त्यांनी आश्वासन पाळले नाहीत. राज्याची जी जबाबदारी होती ती राज्य सरकार पाळत नाही, असे म्हणत 25 ऑक्टोबरपासून आपण राज्याचा पुन्हा एकदा दौरा सुरू करणार असल्याचे यावेळी संभाजीराजे यांनी म्हटले आहे. शिवाय मवाळ आणि आक्रमक या दोन्हीचा मध्य म्हणजे संभाजीराजे आहेत. याची येत्या काळात सरकारला जाणीव होईलच, असा इशारा सुद्धा संभाजीराजे यांनी यावेळी दिला. दरम्यान, आता चर्चेला जाण्याचा विषयच नाही, आजपर्यंत अनेक वेळा चर्चा केली. सरकारला आमच्या मागण्याही माहीत आहेत. त्यामुळे आणखी काय चर्चा करायची ? असा सवाल करत आपण 25 ऑक्टोबरपासून राज्याचा दौरा करणार असल्याचे म्हटले आहे.
'उदयनराजे काय म्हणाले याबाबत माहिती नाही'
मराठा आरक्षणाची मशाल चुकीच्या व्यक्तीच्या हातात असल्याची टीका उदयनराजे भोसले यांनी दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरात केली होती. याबाबत संभाजीराजे यांना विचारले असता ते म्हणाले, उदयनराजे नेमके काय म्हणाले हे मला माहिती नाही. मात्र सातारा गादी आणि कोल्हापूरची गादीमध्ये कोणताही मतभेद नाही, असेही संभाजीराजे यांनी यावेळी म्हटले.
हेही वाचा - केंद्र सरकारने गृह राज्यमंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा- शरद पवारांची मागणी