कोल्हापूर - भारताला पहिले ऑलम्पिक पदक मिळवून देणाऱ्या खाशाबा जाधव ( Khashaba Jadhav ) यांना अद्यापही मरणोत्तर पुरस्कार न देणे म्हणजे सरकारचा नाकर्तेपणा आहे, अशी टीका करत माजी खासदार राजू शेट्टी ( Former MP Raju Shetti ) यांनी खंत व्यक्त केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील जनता खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्कार द्या, अशी सातत्याने मागणी करत आहे. मात्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे, असेही शेट्टी यांनी म्हटले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर शेट्टींनी ही खंत व्यक्त केली आहे. शिवाय कंगना रनौत ( Kangana Ranaut ) सारख्या बाईला पद्म पुरस्कार मिळतो, पण महाराष्ट्राच्या मराठमोळ्या खाशाबा जाधवांना पुरस्कार मिळत नाही, हे दुर्दैव असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ते कोल्हापूरात बोलत होते.
- 'दोन पंतप्रधान, तीन गृहमंत्र्यांकडे मागणी केली मात्र पुरस्कार नाहीच'
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, अनेक वर्षांपासून देशाला पहिले ऑलम्पिक पदक मिळवून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार मिळावा, अशी मागणी होत आहे. सर्वसामान्य नागरिकांतून सुद्धा अशी मागणी सुरू आहे. मात्र त्यांना अद्यापही मरणोत्तर पुरस्कार न देणे हा सरकारचा नाकर्तेपणा आहे, असे त्यांनी म्हटले. गेल्या 10 ते 15 वर्षांपासून ही सातत्याने मागणी होत आली आहे. शिवाय आपण सुद्धा याबाबत आत्तापर्यंत दोन पंतप्रधान तसेच तीन केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी केली आहे. मात्र कोणत्याही पद्धतीने सरकारने याकडे लक्ष दिले नाही आहे, असेही शेट्टी म्हणाले. खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्कार दिल्यानंतर त्यांची उंची वाढली नसती, मात्र पद्म पुरस्काराची उंची वाढली असती असेही शेट्टी म्हणाले.
- 128 जणांना पद्म पुरस्कार जाहीर
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारताच्या राष्ट्रपतींनी यावर्षी 128 पद्म पुरस्कारांना मान्यता दिली आहे. या 128 जणांच्या यादीत महाराष्ट्रातील 10 जणांचा समावेश आहे. मात्र सातत्याने मागणी होत असलेल्या खाशाबा जाधव यांना पुन्हा एकदा पद्म पुरस्कारापासून डावलण्यात आले याबाबत राजू शेट्टी यांनी खंत व्यक्त केली आहे.