कोल्हापूर - 'ईडी'सारख्या सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, या दडपशाहीला आम्ही घाबरत नाही असे म्हणत, या निषेधार्थ महाविकास आघाडीने कोल्हापुरातील शिवाजी चौक येथे निदर्शने (Mahavikas Aghadi Protest in Kolhapur) केली. यावेळी लोकशाही घोटण्याचा सुरू असलेला प्रयत्न महाराष्ट्र सरकार हाणून पाडेल, असेही यावेळी पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी सांगितले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपविरोधात व्यक्त व्हा -
शिवाय येणाऱ्या काळात प्रत्येकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजप सरकारच्या या दडपशाहीविरोधात व्यक्त व्हावे, असे आवाहनसुद्धा त्यांनी यावेळी केले. यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत पाटील आसगावकर, शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रपती राजवट मुद्द्यावरून मुश्रीफ यांचे चंद्रकांत पाटलांना उत्तर :
यावेळी राष्ट्रपती राजवट मुद्द्यावरून ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना उत्तर दिले आहे. ते म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून भाजपकडून महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, हे मजबूत सरकार आहे. शिवाय गेल्या दोन वर्षांच्या काळात अतिशय चांगल्या पद्धतीने काम या सरकारने केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देशातील तीन उत्तम कामगिरी केलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये नाव घेतले जाते. असे असताना राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी कोणतेही कारण नाही, तरीही याची चर्चा सुरू आहे. कायद्याने हे शक्य नाही आणि जर काही झाले तर न्यायालयसुद्धा आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करावे, असे मुश्रीफ म्हणाले. दरम्यान, मुश्रीफ यांनी कागल येथे आंदोलन केल्यानंतर कोल्हापुरातील महाविकास आघडीच्या या आंदोलनात सहभागी झाले. यावेळी भाजप तसेच ईडी विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.