कोल्हापूर - काँग्रेसला जनतेसमोर जाण्यासाठी कोणताच मुद्दा सापडला नाही, म्हणून कृषी कायद्याचा मुद्दा पुढे करून जनतेसमोर जाता येईल का? हे पाहत आहेत. शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण भाजप सरकार राबवत आहे. तरी या विधेयकांना काँग्रेस आणि इतर मित्र पक्ष विरोध करत आहेत. शिवाय काँग्रेसचा हा विरोध फक्त राजकारणासाठी असल्याचा आरोप केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला.
केंद्र सरकारने कृषी विधेयक मंजूर केली. त्या संदर्भात माहिती देण्यासाठी आज दानवे यांनी कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी मंत्री दानवे म्हणाले, शेतकरी व ग्राहक यांच्यामधील दलाली आमच्या भाजप सरकारने बंद केली. शिवाय काँग्रेस स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा असे म्हणतात. पण सत्तेत असताना त्यांनी शिफारशी लागू केल्या नाहीत, उलट भाजपने 90 टक्के शिफारसी लागू केल्या असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे असे भाजपचे धोरण आहे. मात्र, काँग्रेसला शेतकऱ्यांचे काहीही देणेघेणे नसून, त्यांना फक्त व्यापाऱ्यांचे देणे-घेणे आहे, असा आरोपसुद्धा दानवे यांनी केला आहे.