कोल्हापूर - मी पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. एवढं मोठं संकट असतानाही राज्य शासनाने कोणतेही पॅकेज जाहीर केले नसल्याची टीका विरोधकांनी केली होती, यावर उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावत आपण पॅकेज नाही तर, मदत करणारा मुख्यमंत्री असल्याचे म्हटले आहे. शिवाय महापुराचे पाणी दुष्काळी भागात वळविण्याबाबत सुद्धा अभ्यास करून पुढील निर्णय घेऊ, शिवाय हे करणे किती योग्य आणि अयोग्य हे सुद्धा पाहिले जाईल, असेही त्यांनी म्हटले. कोल्हापूरातील पूरस्थितीबाबत ठाकरे यांनी आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह आमदार, खासदार यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
आता कठोर निर्णय घ्यावे लागतील - मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे म्हणाले की, पुराचं भीषण वास्तव जवळून पाहिल्यानंतर त्यासंदर्भातील कामाला, आराखड्याला गती दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूरबाधित क्षेत्रातील तसेच दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या वस्त्यांचेही चांगल्या पद्धतीने पुनर्वसन करण्यावर आमचा भर आहे. हे साध्य करण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील. नदीपात्रातली अतीक्रमणे, बांधकामांना परवानगी न देण्याच्या सूचना मी दिल्या आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महापुराच्या पाण्याचा इतर ठिकाणी उपयोग करता आला तर उत्तम - यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, महापुराच्या संकटाचे संधीत रूपांतर करता येईल का, हे पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे दुष्काळी भागात जर हे महापुराचे पाणी नेता आले तर अधिक उत्तम होईल. मात्र याचे अनेक फायदे आणि तोटे सुद्धा असू शकतात. एखादे संकट टाळायला दुसरे संकट तर उभे करत नाही ना, याबाबत सुध्दा अभ्यास करायला हवा. शिवाय यासाठी येणारा खर्च आणि इतर बाबींचा सुद्धा विषय आहेच. त्यामुळे या गोष्टींचा सर्व बाजूंनी विचार करून निर्णय घ्यावा लागेल असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले असून महापुराच्या पाण्याचा उपयोग करता आला तर उत्तम होईल असेही त्यांनी म्हटले.
पूरग्रस्त नागरिकांचे पुनर्वसन करण्यावर भर -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, पूरबाधित क्षेत्रातील गावे तसेच दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या वस्त्यांचे चांगल्या पद्धतीने पुनर्वसन करण्यावर राज्य शासनाचा भर राहील. भविष्यात सुद्धा पूरपरिस्थितीत नागरिकांचे नुकसान होऊ नये यासाठी आता कठोर निर्णय घ्यावे लागतील, असेही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटले. ते पुढे म्हणाले, राज्यात कोल्हापूर-सांगलीसह अन्य काही जिल्ह्यांवर अतिवृष्टीमुळे पुराचे संकट ओढवले आहे. नदी-नाले ओढ्यांवर नागरिकांनी अतिक्रमण केल्यामुळे ही स्थिती उद्भवली आहे. रेड-ब्लू लाईनमध्ये झालेल्या बांधकामांमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. भविष्यात अशा बांधकामांना परवानगी देऊ नये. या भागात झालेली अतिक्रमण काढावीत, अशा सूचना सुद्धा दिल्या असल्याची माहिती सुद्धा उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मी पूरस्थिती पाहतोय, तुम्ही भोगताय, यातून नक्की मार्ग काढू -
यावेळी ते पुढे म्हणाले, महापुरामुळे झालेली हानी मी पाहत आहे. मात्र, तुम्ही कोल्हापूरकर भोगत आहे. यातून नक्कीच मार्ग काढण्यात येईल. स्थलांतर करून प्रशासनाने लाखो नागरिकांचे प्राण वाचवल्याबद्दल प्रशासनाला धन्यवाद सुद्धा यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिले. कोरोना, पुर आणि पुराच्या अनुषंगाने झालेल्या नुकसान तसेच रोगराई रोखण्याचे राज्यासमोर प्रमुख आव्हान असून राज्य सरकार याचा धैर्याने मुकाबला करेल असेही त्यांनी यावेळी म्हटले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस शाहुपुरीत एकत्र, दोघांमध्ये संवाद -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर पूरपरिस्थितीचा पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आले होते. दोघांनीही कोल्हापुरातील विविध पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी केली. जिथे मुख्यमंत्री येणार होते तिथेच फडणवीस देखील पोहोचले. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते दोघेही एकाच ठिकाणी शहरातील शाहुपुरीत भेटले. यावेळी आजी-माजी मुख्यमंत्री एकत्र आले आणि त्यांच्यात संवादही झाला. दोघांनीही कोल्हापुरातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला.