कोल्हापूर - अंबाबाई मंदिर परिसरात असलेल्या मणकर्णिका कुंडाच्या उत्खननाचे काम सुरू आहे. जवळपास 27 फुटांपर्यंतच्या खुदाईचे काम पार पडले असून, त्यातून अनेक पुरातन वस्तू सापडल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने जर्मन बनावटीची बंदूक आणि जिवंत काडतुसे, पुरातन नाणी, तांब्याची भांडी, विरगळ अश्वारुढ पार्वतीची तसेच अन्नपूर्णा देवीची पितळेची मूर्ती आदी गोष्टी सापडल्या आहेत. अजूनही खुदाईचे काम सुरू आहे. जवळपास 12 ते 13 फुटांपर्यंत आणखी खुदाई होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच मणकर्णिका कुंडाचे मूळ रूप सर्वांना पाहायला मिळणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली.
हेही वाचा - सर्वच क्षेत्रांना फटका देणाऱ्या कोरोना महामारीला राज्यात १ वर्ष पूर्ण
काय आहे मणकर्णिका कुंड?
अंबाबाई देवीच्या स्नानाचे पाणी ज्या कुंडामध्ये जाते, त्या मणकर्णिका कुंडाच्या उत्खननाचे काम सद्या सुरू आहे. हा कुंड किती मापाचा आहे किंवा किती खोल आहे याबाबत काही पुस्तकांमध्ये अंदाजे मापं नमूद असलेली दिसून आली. काही जाणकार व्यक्तींकडून कुंडाला एकूण पंधरा पायऱ्या आणि जवळपास 60 फूट रुंदी 60 फूट लांबी असावा अशा गोष्टी समोर आल्या. मात्र, हा कुंड नेमका कोठे आहे? कुठून सुरू होतो आणि किती खोल आहे ? याची कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. गेल्या अनेक वर्षांपासून हा कुंड बुजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे उपलब्ध काही मोजक्या माहितीच्या आधारेच कुंडाच्या खोदाईचे काम सुरू झाले. हे सगळं काम करत असताना कोणत्याही पद्धतीने यंत्राचा वापर न करता केवळ मनुष्यबळाच्या आधारेच याची खुदाई करण्यात येत आहे. जवळपास आठ महिन्यांपासून खुदाईचे काम सुरू आहे. आता काम जवळपास पूर्णच होत आले असलयाने या कुंडाचा आकार स्पष्टपणे दिसू लागला आहे. शिवाय मणकर्णिका कुंडाची भव्यतासुद्धा समोर आली आहे.
हेही वाचा - मनसुख हिरेन, खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणावरून विधानसभेत गोंधळ
कुंडामध्ये कोणकोणत्या वस्तू सापडल्या?
सुस्थितीत असलेली केवळ 6 इंचाची जर्मन बनावटीची बंदूक, बंदुकीच्या काही गोळ्या, बंदुकीची पुढच्या नळीचा एक भाग, तांब्याची आकर्षक बॅटरी, अन्नपूर्णा तसेच पार्वतीची पितळेची मूर्ती, 100 हुन अधिक तांब्याची नाणी, अनेक वीरगळ, शिवलिंग, कोरीव दगड, काचेचा दिवा (झुंबरमधला भाग असावा), तांब्याची तसेच पितळेची भांडी आदी वस्तू सापडल्या आहेत.
खुदाईच्या कामानंतर डागडुजीचे काम हाती घेणार -
सद्या मणकर्णिका कुंडाच्या खुदाईचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. आणखी 1 महिन्यात ते पूर्ण होईल. त्यानंतर कुंडाचे मूळ रूप समोर आल्यानंतर या संपूर्ण परिसराच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात येणार आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर भक्तांनाही मणकर्णिका कुंड पाहता येणार आहे. याठिकाणी सापडलेल्या वस्तूसुद्धा प्रदर्शनाच्या रूपाने भक्तांसाठी ठेवल्या जाणार असल्याची माहितीसुद्धा देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली.
हेही वाचा - कांदा, लसूण, मसाला फोडणीसह कालव्याचा रस्सा ही पर्यटकांसाठी पर्वणी