औरंगाबाद - मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत भाजपा अडचणीत सापडलयाचे चित्र आहे. माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांच्या नंतर बीडचे रमेश पोकळे यांनी देखील बंड करत उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक भाजपसाठी अवघड जाण्याची चिन्ह आहेत.
पदवीधर मतदारसंघात भाजपाने दिलेला उमेदवार तकलादू आहे. त्यांना विजय मिळवणे शक्य नाही. पहिल्या पसंतीस भाजपला विजय मिळणे अवघड जाईल, त्यामुळे दुसऱ्या पसंतीसाठी मला उमेदवारी देण्याची विनंती केली होती. अर्ज मागे घेण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी मला विनंती केली मात्र पक्षात माझा विचार होणार नसेल तर काय फायदा? याआधी पण माझी उमेदवारी पक्षाने नाकारली. पक्षात काम करत असताना पक्ष बांधणीसाठी आणि निवडणुकीसाठी काम केलं. मात्र न्याय मिळाला नसल्याने अपक्ष म्हणून काम करणार असल्याचे मत भाजप बंडखोर रमेश पोकळे यांनी व्यक्त केलं.
पंकजा मुंडे स्वतः नाराज... पण त्या बोलतील
रमेश पोकळे पंकजा मुंडे समर्थक म्हणून परिचित आहेत. गोपीनाथ मुंडे यांची प्रतिमा हातात घेऊन त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मुंडे साहेब असते, तर ते स्वतः आले असते. मात्र ते नाहीत. यामुळे त्यांची प्रतिमा सोबत ठेवल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यांच्या बंडखोरीमुळे पंकजा मुंडे अडचणीत येतील का? या प्रश्नावर त्या स्वतः नाराज आहेत, असे पोकळे म्हणाले. मात्र त्या स्वतः वेळ आली की बोलतील, असे त्यांनी म्हटले.
जयसिंगराव गायकवाड यांनी माझा प्रचार करावा
पदवीधर मतदार संघात होणाऱ्या निवडणुकीत जयसिंगराव गायकवाड यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याऐवजी माझा प्रचार करावा, अशी विनंती भाजपा बंडखोर रमेश पोकळे यांनी केली. राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांची प्रतिमा स्वच्छ नाही. निवडणूक आली की ते मतदारांसमोर येतात. अशा मालिन प्रतिमेच्या उमेदवारांचा प्रचार करण्यापेक्षा माझ्यावर विश्वास ठेऊन माझा प्रचार करावा, अशी विनंती त्यांना करणार असल्याचे रमेश पोकळे म्हणाले.