औरंगाबाद - भाजपच्या ( BJP ) निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा ( Nupur Sharma ) यांनी प्रेषित पैगंबर यांच्या बाबत केलेल्या विधानाचा निषेध करण्यासाठी मुस्लिम समाज रस्त्यावर ( Muslim Protest ) उतरला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर दुपारच्या नमाज नंतर मुस्लिम बांधवांनी एकत्र येत नुपूर शर्मा यांचा निषेध केला.
नुपूर शर्माचे फोटो जाळले - नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ मुस्लिम संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती. त्या आवाहनाला प्रतिसाद देत हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरले होते. भाजप विरोधी घोषणाबाजी करून नुपूर शर्मा यांचा फोटो जाळून रोष यावेळी व्यक्त केला. भाजप विरोधात रान पेटविणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. भाजपचे नेते, प्रवक्ते आणि कार्यकर्ते सतत मुस्लिम विरोधी भाष्य करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या विरोधात रोष व्यक्त करत असल्याचं आंदोलकांनी सांगितलं.
खासदार जलील मोर्चात सहभागी - भाजप विरोधात होत असलेल्या आंदोलनात एमआयएम प्रदेशाध्यक्ष खा. इम्तियाज जलील देखील सहभागी झाले होते. नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अंतराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा खराब झाली आहे. भारताने माफी मागावी, अशी मागणी केली जात आहे. भाजपकडून नेहमीच अशी विधान होत असल्याने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समोर येऊन आपली भूमिका मांडायला हवी. आजचा बंद योग्यच आहे, असं मत खा. इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा - Protest Against Nupur Sharma : सोलापुरात नुपूर शर्मा व जिंदाल विरोधात एमआयएमचा विराट मोर्चा