औरंगाबाद - जून महिन्यात दडी मारल्यानंतर पावसाने मराठवाड्यात जुलै महिन्यात जोरदार हजेरी लावली. महिनाभरात विभागातील १ हजार ६४७ गावांना तडाखा बसला असून, त्यामध्ये तब्बल ६ लाखांहून अधिक शेतकरी बाधित झाले आहेत. तर, दुसरीकडे पंचनामे करण्यास सरकारी अनास्था पुन्हा एकदा समोर आली ( marathwada heavy rain 43 people 539 animals death ) आहे.
१८२ परिमंडळात अतिवृष्टी - जुलै महिन्यात पावसाने मराठवाड्यात जोरदार हजेरी लावली. मराठवाड्यातील १८२ मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्हे सोडले तर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम दिसून आला. जालन्यात २५५.७४ हेक्टर शेतीचे, परभणीत १२००, हिंगोलीत ७६ हजार ७७१ हेक्टर, नांदेडमध्ये २ लाख ९८ हजार ८६१ हेक्टर बीडमध्ये २६.८० हेक्टर आणि लातूरमध्ये १६४०.५७ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. यात जवळपास ६ लाख २१ हजार ६९४ शेतकरी बाधित झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.
इतर हानी मोठी - मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली, त्यामुळे पावसात जीवित आणि वित्तहानी देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्याचा विचार करता ४३ जणांचा वीज कोसळून आणि पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. शिवाय शेतकऱ्यांची ५३९ जनावरे दगावली आहेत. त्याचबरोबर १३९० घरांची पडझड झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाला असून ५०९ रस्ते ४६० पुल आणि सिंचनाच्या योजनांचे नुकसान झालं. या दुरुस्तीसाठी ४३३ कोटींचा निधी लागणार असल्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
मराठवाड्यात सहा जिल्ह्यांमध्ये नुकसान - नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. नांदेड जिल्ह्यातील १५७० गाव बाधित झाली आहेत. ज्यामध्ये ५ लाख ३३ हजार ३८४ शेतकरी, हिंगोली जिल्ह्यात ६२ गाव बाधित झाली. ज्यात ८५६०० शेतकरी, परभणी जिल्ह्यात ३ गावांमधे १५०० शेतकरी, लातूर जिल्ह्यात ८ गावांमधे ७७५ शेतकरी, बीड जिल्ह्यात १ गावात ५८ शेतकरी, जालना जिल्ह्यात १ गावात ३७७ शेतकरी बाधित झाले आहेत.
पंचनामे अद्याप संथगतीने - एकीकडे शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने नुकसान होत असताना सरकारी यंत्रणा अद्याप सुस्तावलेल्या अवस्थेत आहे. आतापर्यंत जवळपास ४० टक्के पंचनामे झाले आहेत. राजकीय वातावरण पाहता अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झाला नसल्याने कृषी खात्यात लक्ष देण्यास जबाबदार अधिकारी नाही. परिणामी सरकारी यंत्रणा गतिमान होईल कशी, असा प्रश्न आहे. त्यामुळेच पंचनामे पूर्ण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
हेही वाचा - Pravin Darekar : 'उद्धव ठाकरेंना सत्तेची लालसा, चटक ठेवली नसती तर...'; प्रवीण दरेकरांनी साधला निशाणा