औरंगाबाद - शहरातील व्यापाऱ्यांची कोरोना तपासणी करण्याचा मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी घेतलेला निर्णय अत्यंत उपयुक्त ठरला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये झालेल्या तपासणीमध्ये 186 व्यापारी कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बाजारपेठ उघडल्यावर कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका काही प्रमाणात टळला आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शहरात नऊ दिवसांची जनता संचारबंदी लागू करण्यात आली होती. संचारबंदीच्या आठव्या दिवशी पालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी नव्याने आदेश काढले. या आदेशानुसार व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यापूर्वी कोरोनाची चाचणी करण्याचे अनिवार्य करण्यात आले. या निर्णयाला व्यापाऱ्यांकडून विरोध करण्यात आला. कमी वेळेत पासणी करणे शक्य नसल्याने मुदत वाढ देण्याची मागणी व्यापारी महासंघाने केली. त्यानुसार दोन दिवस दूध, अंडी, मांस, भाजीपाला दुकानदार आणि सलून चालकांना तपासणी अनिवार्य करण्याचा निर्णय मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी घेतला.
दोन दिवसांत 9 हजार 810 व्यापाऱ्यांच्या तपासण्या
आयुक्तांच्या या निर्णयानंतर शनिवारी दुपारनंतर शहरातील विविध ठिकाणी व्यापाऱ्यांनी तपासणीसाठी नोंदणी केली. शनिवार आणि रविवार या दोन दिवसांमध्ये जवळपास 9 हजार 810 व्यापाऱ्यांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 186 व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण असल्याचे आढळून आले. शनिवारी 4 हजार 418 व्यापाऱ्यांची अँटीजन तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 87 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर रविवारी 5 हजार 389 व्यापाऱ्यांची तपासणी करण्यात आली त्यामध्येही 99 व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या तपासणीमध्ये एक व्यापाऱ्याच्या कुटुंबातील सर्वांनाच कोरोनाची बाधा असल्याचे आढळून आले.
मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी घेतलेला निर्णय हा कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. जर कोरोना चाचणी घेण्यात आली नसती तर या कोरोना बाधित व्यापाऱ्यांचा ग्राहकांशी संपर्क होण्याची शक्यता होती. त्यामधून होवू शकणारा कोरोनाचा संसर्ग टाळण्यात पालिकेला वेळीच यश आले आहे.