औरंगाबाद - सरकारी भरती प्रक्रियेवर प्रशचिन्ह निर्माण होत चालले आहेत. आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेत गोंधळ उघड झाल्यानंतर आता औरंगाबाद शहर पोलीस भरती प्रक्रियेतदेखील गोंधळ असल्याचे मंगळवारी समोर आले.
हॉल तिकीट नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था
2019मध्ये शहर पोलीस भरती प्रक्रियेबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. 15 जागांसाठी ही भरती प्रक्रिया होती. ज्यामध्ये 10 मागासवर्गीय, 2 ओबीसी, तर 3 जागा एसईबीसीसाठी होत्या. त्यासाठी अर्ज करत असताना एसईबीसी पर्याय होता, मात्र ते आरक्षण रद्द झाल्याने उमेदवारांनी ईडब्लूएस आरक्षणातून अर्ज केले. 20 ऑक्टोबरला ही परीक्षा होणार असली, तरी या आरक्षणातून अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना हॉल तिकीट मिळाले नसल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
उमेदवारांची पोलीस आयुक्तालयात धाव
पोलीस भरती असल्याने हजारो बेरोजगार तरुणांनी आपले अर्ज भरले, मात्र काही तासांवर परीक्षा आली असताना देखील हॉल तिकीट न आल्याने काही उमेदवारांनी थेट पोलीस आयुक्तालय गाठले, तिथे गेल्यावर या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना उडवाउडवीची उत्तर मिळाली. आपली तक्रार मंत्रालयात करा अस सांगण्यात आल्याने, आता जावे कुठे असा प्रश्न परीक्षार्थी उमेदवारांना पडला आहे. तर परीक्षा शुल्क म्हणून घेतलेले पैसेही गेले आणि परीक्षा घेणार नसतील तर ही आमची फसवणूक असल्याचा आरोप करत आम्हाला नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी परीक्षार्थी उमेदवारांनी केली आहे.