अमरावती - श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील अकरावीत शिक्षण घेणारी तरुणी बेपत्ता झाली आहे. ही तरुणी बुधवारी महाविद्यालयात गेली. मात्र, चार दिवस उलटून गेले तरीही ती घरी परतलेली नाही. याबाबत गुरुवारी गडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलीस तिचा शोध घेत आहे.
वैष्णवी मनोहर टेकाम, असे हरवलेल्या तरुणीचे नाव आहे. वैष्णवी ही मूळची भातकुली तालुक्यात येणातील सावरखेड या गावाची आहे. तिचे वडील दुकाने निरीक्षक विभागात अंजनगाव येथे शिपाई पदावर कार्यरत असल्याने तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण अंजनगाव येथील सीताबाई संघवी शाळेत झाले. दहावीनंतर वैष्णवीने अमरावतीच्या श्री शिवाजी विज्ञान महाविद्यलयात अकरावीच्या वर्गात प्रवेश घेतला.
वैष्णविसोबत तीच्या मैत्रिणीला ही श्री शिवाजी विज्ञान महाविद्यलयात अकरावीला प्रवेश मिळाला. दोन्ही मैत्रिणी अमरावतीत शिकायला आल्याने त्यांच्या पालकांनी येथील गडगेनगर परिसरात भाड्याने खोली करून दिली. सोमवारी महाविद्यालय सुरू झाले. बुधवारी वैष्णवी महाविद्यालयात गेल्यावर तिथून शिकवणी वर्गाबाबत चौकशीसाठी गेली ती घरी परतलीच नाही. वैष्णवी घरी आली नाही अशी माहिती तिच्या मैत्रिणीने दिल्यावर तिचे आई-वडील, भाऊ अंजनगववरून अमरावतीला आले. अमरावतीच्या दस्तुरनगर परिसरात राहणाऱ्या वैष्णवीच्या काकांसह सर्व नातेवाईकांनी वैष्णवीचा शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. गुरुवारी त्यांनी गडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी वैष्णवीच्या मैत्रिणींकडे वैष्णवीबाबत चौकशी केली. मात्र, वैष्णवी नेमकी कुठे गेली हे मैत्रिणीलाही माहिती नाही.
अमरावती शहरात नवखी असणारी वैष्णवी नेमकी कुठे गेली असेल?, तिला कोणी पळवले तर नाही? अशा सर्व दिशेने पोलीस शोध घेत आहेत. वैष्णवीचे छायाचित्र बसस्थानक, रेल्वेस्थानकासह सार्वजनिक ठिकाणी लावण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. यासाठी तिच्या पालकांनीही परवानगी दिली आहे. आपली मुलगी सापडावी यासाठी सर्व प्रयत्न व्हावेत, असे वैष्णवीच्या नतेवाईकांचे म्हणणे आहे.