अमरावती - राज्याचे माजी वन मंत्री असणाऱ्या नेत्याला कोरोना झाल्यामुळे अमरावतीत प्रचंड खळबळ उडाली आहे. अमरावतीत कोरोनाबधितांची संख्या 65 वर पोहचली आहे.
सोमवारी रात्री 4 कोरोनाग्रस्तांचा चाचणी अहवाल समोर आला. या अहवालातील व्यक्तींबाबत खोलपुरी गेट परिसरातील 70 वर्षीय महिला आणि शिराळा येथील दोन पुरुषांसह जुने कॉटन माकेट परिसरात राहणाऱ्या 61 वर्षीय पुरुष असा उल्लेख आहे. हा अहवाल वाऱ्यासारखा सोशल मीडियावर पसरला आणि जुना कॉटन मार्केट परिसरातील कोरोनाबधित व्यक्ती ही राज्याचे माजी मंत्री असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी माजी मंत्री आजारी पडल्यामुळे त्यांचा स्वॅब चाचणीसाठी घेण्यात आला होता. चाचणीचा अहवाल प्राप्त झाला आहे.
कोरोना असल्याचे स्पष्ट होताच माजी मंत्री उपचारासाठी कोविड रुग्णालयात दाखल झाले असून त्यांच्या कुटुंबियांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे.. त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला नेण्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक विचार करीत आहेत. माजी मंत्री कोरोनाबाधित झाल्यामुळे अमरावतीकर प्रचंड धास्तावले आहेत. विशेष म्हणजे अमरावतीत कोरोनाचा पहिला रुग्ण 3 एप्रिलला समोर आल्यावर त्याला कोरोनाची लागण नेमकी कुठून झाली याचा शोध लागू शकला नाही. कोरोनामुळे अमरावतीत एकूण 10 जण दगावले आहेत. सोमवारी कोरोनाग्रस्तांची संख्या 65 वर पोहचल्याने अमरावतीकरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.