अमरावती - अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्यात डेंग्यूसह साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया, थंडीतापाची लाट आली असून जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांसाठी जागा नसल्याने एका बेडवर दोन रुग्णांवर उपचार केले जात आहे. अनेक रुग्णांना चक्क बेडच्या खाली झोपवून त्यांच्यावर उपचार केले जात असल्याचे विदारक वास्तव आहे.
हेही वाचा - संजय राऊत म्हणजे 'खोट बोल पण रेटून बोल' - चंद्रकांत पाटील
जिल्हा सामान्य रुग्णालयात विदारक परिस्थिती
जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्वच वॉर्डमध्ये रुग्णांची गर्दी झाली असून वॉर्ड क्रमांक दोन, पाच, सहा, आठ व दहा, तसेच अतिदक्षता विभागात डेंग्यू मलेरिया हिवताप रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे सर्व वॉर्ड रुग्णांनी खच्चून भरले असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिस्थिती अतिशय विदारक आहे. रुग्णालयातील गर्दी पाहता रुग्णालय प्रशासनाने चक्क खाली गाद्या टाकून रुग्णांना त्यावर झोपवले आहे. आपल्या रुग्णाला बेड मिळावा यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये स्पर्धा लागल्याचेही जिल्हा सामान्य रुग्णालयात पहायला मिळत आहे. डेंग्यू, मलेरिया संदर्भात रक्ताचे नमुने येण्यास उशीर होत असल्यामुळे रुग्णांना कोणता आजार आहे, हे कळण्यास उशीर लागत आहे.
लहान मुलांचा वॉर्ड हाऊसफुल
जिल्हा सामान्य रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक पाच हा लहान मुलांचा वॉर्ड असून हा वॉर्ड सध्या हाऊसफुल झाला आहे. रुग्णालयाची स्थापना झाल्यापासून लहान मुलांच्या वॉर्डमध्ये केवळ चाळीस बेडची व्यवस्था आहे. आज एकूण 66 बालक या वॉर्डमध्ये उपचारासाठी दाखल झाले आहे. लहान मुल तापाने फणफणत असून या मुलांवर उपचार करताना खुद्द डॉक्टर आणि परिचारिकांनाही समस्यांचा सामना करावा लागत आहे. या वॉर्डमध्ये अनेक चिमुकल्यांना बेडच्या खाली त्यांच्या आईसोबत किंवा आजीसोबत बसवून त्यांच्यावर उपचार केला जात आहे.
जिल्हाभरातील रुग्णांची अमरावतीकडे धाव
सध्या संपूर्ण अमरावती जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया, व्हायरल फिवर, टाइफाइडचे रुग्ण वाढले आहे. मोर्शी आणि अचलपूर हे दोन तालुके साथ रोगांचे हॉटस्पॉट झाले असून जिल्ह्यातील सर्व चौदा तालुक्यांत रुग्णसंख्या वाढली असताना जिल्हाभरातील रुग्णांची उपचाराकरिता अमरावती शहराकडेच धाव आहे. यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयावरील ताण वाढल्याचे सांगण्यात येत आहे.
'पीडीएमएमसी'त ही सर्व वॉर्ड फुल
अमरावती शहरातील डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय अर्थात 'पीडीएमएमसी' येथेही सर्वच वॉर्ड रुग्णांनी अक्षरशा तुंबले आहेत. ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने रुग्ण पीडीएमएमसी येथे उपचारासाठी दाखल झाले आहेत. पीडीएमएमसी येथील लहान मुलांचा वॉर्ड रुग्णांनी भरला आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयाप्रमाणेच अनेक अडचणी या ठिकाणीही जाणवत असून येथील डॉक्टर आणि परिचारिका रुग्णांवर योग्य उपचार करण्यासाठी धडपड करीत असल्याचे दिसत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय आणि पीडीएमएमसीसह खासगी रुग्णालयांत देखील मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत.
काय म्हणतात डॉक्टर
परिस्थिती गंभीर आहे, वॉर्डमध्ये बेडची संख्या 40 असताना रुग्णांची संख्या 66 आहे, यामुळे अनेक रुग्णांची व्यवस्था फ्लोअरवर करण्यात आली आहे. आमच्या परीने आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत, जिल्हा शल्य चिकित्सक आम्हाला योग्य मार्गदर्शन करीत आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनीही सावधता पाळावी, असे जिल्हा सामान्य रुग्णालयातील बालरोगतज्ञ डॉ. ऋषिकेश नागलकर 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले.
रुग्णांच्या नातेवाईकांच्या वेदना
जिल्हाभरातून रुग्ण उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, तसेच पीडीएमएमसी येथे दाखल झाले आहेत. कोरोना काळात जिल्हा प्रशासनाने अतिशय योग्य काम केले, अगदी तसेच गांभीर्य आता साथ रोगाच्या काळातही दाखवायला हवेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. आमच्या मुलांना पलंगाखाली झोपवून त्यांच्यावर उपचार केला जात आहे. जिल्हा प्रशासनासह जिल्ह्यातील आमदार, खासदार व सर्व नेत्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना योग्य आरोग्य सुविधा पुरविण्याबाबत लक्ष घालावे, असे गुंजन गोळे या रुग्णाच्या नातेवाईक 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाल्या.
डेंग्यूमुळे जिल्ह्यात नऊ जणांचा मृत्यू
डेंग्यूमुळे जिल्ह्यात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तिवसा तालुक्यातील तीन जण डेंग्यूने दगावले आहेत, तर चिखलदरा तालुक्यात एक, अमरावती तालुक्यात एक आणि मोर्शी तालुक्यात चार जणांचा मृत्यू डेंग्यूमुळे झाला आहे.
..अशी आहे डेंग्यूची परिस्थिती
जिल्ह्यात सध्याच्या घडीला धामणगाव रेल्वे तालुक्यात डेंग्यूचे रुग्ण आहेत, भातकुली तालुक्यात 19 रुग्ण आहेत, दर्यापूर तालुक्यात 8, धारणी तालुक्यात 76, मोर्शी तालुक्यात 189, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात 9, चिखलदरामध्ये 11, अचलपूर तालुक्यात 403, चांदूर बाजार तालुक्यात 13, अमरावती शहरात 88, तर तिवसा तालुक्यात 7 रुग्ण आहेत.
हेही वाचा - पत्ता विचारण्यासाठी 'पाच' रुपये, अन् पुढच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी द्यावे लागतात दहा रुपये