अमरावती - दीड-दोन वर्षांपूर्वी अमरावती जिल्ह्यात थैमान ( Corona Cases In Amravati ) घालणारा कोरोना पुन्हा एकदा जिल्ह्यात सक्रिय झाला आहे. सध्या घडीला जिल्ह्यात कोरोनाचे सहा सक्रिय ( Active Corona Patient In Amravati ) रुग्ण असून प्रशासनाच्यावतीने काळजी घेण्याचे आवाहन अमरावतीकरांना करण्यात आले आहे.
कोरोनामुळे महिनाभरापूर्वी चिमुकली मृत्यू - गत सहा महिन्यांपासून जिल्हा कोरोना मुक्त झाला असेच चित्र जिल्हाभर पाहायला मिळत असताना महिनाभरापूर्वी 28 एप्रिल रोजी चांदूर बाजार तालुक्यातील एका 12 वर्षीय चिमुकलीचा कोविड रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाला होता. कोरोनामुळे तिची प्रकृती बिघडल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, ही चिमुकली दगावल्यामुळे जिल्ह्यात कोरोनाची भीती कायम असल्याचे संकेत महिनाभरापूर्वीच मिळाले असताना आता पुन्हा जिल्ह्यात सहा नवे रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहेत.
अमरावती शहरात चार, ग्रामीण भागात दोन रुग्ण - सध्यास्थितीत कोरोनाचे अमरावती शहरात चार रुग्ण असून दोन रुग्ण हे ग्रामीण भागात आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय येथील कोरोना चाचणी केंद्रात 16 एप्रिल रोजी तीन चाचण्या पॉझिटीव्ह आल्या असून 17 मे रोजी सुद्धा तिघाजणांना कोरोना असल्याचा अहवाल प्राप्त झाला.
चाचण्यांमध्ये घट - आता 16 आणि 17 मे रोजी एकूण सहा जणांच्या चाचण्या या पॉझिटिव्ह आल्या असल्या तरी जानेवारी महिन्यापासून काल-परवापर्यंत एकही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली नाही, अशी माहिती डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना चाचणी प्रयोगशाळेत कार्यरत डॉ. अर्चना प्रताप निकम यांनी दिली.
जिल्ह्यात 1 लाख 5 हजार 961 कोरोनाबाधीत - अमरावती जिल्ह्यातील एकूण 1 लाख पाच हजार 961 नागरिकांना कोरोनाची लागण होऊन गेली आहे. दुर्दैवाने यापैकी 1593 जणांचा मृत्यू झाला. सध्या गडीला जिल्ह्यात सहा रुग्ण असून जिल्हा प्रशासनाच्यावतीने ज्या व्यक्तींनी अद्यापही लस घेतली नाही, अशा सर्वांनी लस घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचेही लसीकरण करावे, असे आवाहन पालकांना करण्यात आले आहे. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामुळे शाळा बंद असल्यामुळे शाळेत लसीकरण मोहीम थांबली असल्याने पालकांनी आता आपल्या घराच्या परिसरात असणाऱ्या लसीकरण केंद्रावर जाऊन मुलांना लस द्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केले आहे.
हेही वाचा - Ketki Chitale Police Custody : केतकीला 24 मे पर्यंत पोलीस कोठडी; रबाळे पोलीस करणार चौकशी