अमरावती - शहरासह जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आलेल्या एका कुख्यात गुन्हेगाराने अन्य दोन साथीदारांसमवेत मंगळवारी रात्री नांदगाव पेठ व फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हैदोस घातला. त्याने आधी एका हॉटेल कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला केला. तर रात्रीच्यावेळी एका गायीवर चाकूने वार करून तिला ठार केले. या प्रकरामुळे परिसरात खळबळ उडाली. या दोन्ही प्रकरणात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हॉटेलच्या चौकीदरावर हल्ला - सराईत गुन्हेगार गोंडीला जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. मात्र, तो त्या आदेशाचे उल्लंघन करून शहरात दाखल झाला. मंगळवारी रात्री तो साथीदार विशाल व शेख मोईनसह नागपूर मार्गावरील एका हॉटेलमध्ये गेला. यावेळी बार बंद झाला होता. गोंडीने चौकीदार जंगबहादूर राठोड (५०) व रावसाहेब नितनवरे (५९,दोघेही रा. रहाटगाव) यांना गेट उघडण्यास सांगितले. बार बंद झाल्याने त्यांनी गेट उघडण्यास नकार दिला. त्यावेळी गोंडीसह विशाल व शेख मोईन यांनी चौकीदार जंगबहादूर राठोड यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला चढविला. त्यानंतर त्याने तेथून पळ काढला. या प्रकरणी रावसाहेब नितनवरे यांनी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
गाईला भोसकला चाकू - त्या घटनेनंतर गोंडीसह त्याचे साथीदार व्यंकय्यापुरात आले. यावेळी गोंडीने व्यंकय्यापुरा येथील रहिवासी तथा पशुपालक राजा श्याम यादव (२१) याच्या गर्भवती गायीची चाकूने भोसकून हत्या केली. दरम्यान, पहाटेच्या सुमारास नांदगाव पेठ पोलिसांनी गोंडी, विशाल व शेख मोईनला अटक केली. दुसरीकडे फ्रेजरपुरा ठाण्यातही राजा यादव यांच्या तक्रारीवरून गोंडीसह त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
तिघांना अटक - याप्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी तडीपार आरोपी ऋषीकेश उर्फ गोंडी उर्फ उमेश मोडक (२५, राहुलनगर, बिच्छूटेकडी), विशाल रतनसिंग राजपूत (२४, व्यंकय्यापुरा) व शेख मोईन शेख मुख्तार (२०, नांदगाव पेठ) या तिघांविरूध्द गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली आहे. तसेच पोलीस आयुक्तांनी या प्रकरणी डीबी स्कॉडवर कारवाई केली आहे. तडीपार आरोपी मुक्तपणे शहरात वावरतो, तो मुक्त हैदोस देखील घालतो, तर डीबी स्कॉड करते तरी काय, अशी विचारणा त्यांनी केली. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यातील डीबी स्कॉड रद्द करण्याची कारवाई केली. तसेच डीबी स्कॉडमधील सर्व अंमलदारांना पोलीस मुख्यालयाशी संलग्न करण्यात आले आहे.