मुंबई - शेअर बाजार निर्देशांकात सकाळच्या सत्रात घसरण झाली आहे. शेअर बाजाराने गुरुवारी तेजी अनुभवली होती. गुंतवणूकदार आज शेअर विक्री करून नफा नोंदवित असल्याचे दिसत आहे.
बँकिंग आणि वित्तीय कंपन्यांच्या शेअरवर विक्रीचा दबाव आहे. सकाळच्या सत्रात सकाळी दहा वाजून दहा मिनिटाला मुंबई शेअर बाजार निर्देशांक २३५.४४ अंशाने घसरून ४३,३५८.२३ वर पोहोचला. निफ्टीचा निर्देशांक ६०.३० अंशाने घसरून १२,६८८.८५ वर पोहोचला. दीनदयाळ इनव्हेस्टमेंट्सचे तांत्रिक विश्लेषक मनिष हाथिरमानी म्हणाले, की निफ्टीने विसावा घेतल्याचे दिसत आहे. ट्रेण्ड कायम राहण्यासाठी हे नैसर्गिक आहे. निफ्टीच्या निर्देशांकाचे सुमारे १३,००० अंश हे उद्दिष्ट असायला हवे. त्यामुळे संपूर्ण शेअर बाजाराला फायदा मिळू शकतो. आपल्याला १२,००० अंशापर्यंत आधार मिळाला आहे. त्यामुळे आपण आणखी उद्दिष्ट ठेवू शकतो.
शेअर बाजारात तेजी येण्याचा विश्लेषकांचा अंदाज-
भारतीय शेअर बाजार येत्या काही दिवसात नवा विक्रम करणार असल्याचा शेअर बाजार विश्लेषकांचा अंदाज आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक आणि सणाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी असेल, असाही विश्लेषकांनी अंदाज वर्तविला आहे. एनव्हिजन कॅपिटल सर्व्हिसेसचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक नीलेश शाह म्हणाले, की अमेरिकेच्या संसदगृहावर रिपब्लिकन पक्षाचे नियंत्रण असणार आहे. त्यामुळे डॉलर कमकुवत राहून भारतासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेचा फायदा होईल. असे असले तरी गुंतवणूकदारांनी काळजी घ्यावी, असे त्यांनी मत व्यक्त केले.
दरम्यान, मागील सत्रात शेअर बाजार बंद होताना निर्देशांक ४३,५९३.६७ वर स्थिरावला होता.