नवी दिल्ली - जागतिक बाजारात खनिज तेलाचे दर घसरले आहेत. याचा फायदा मिळेल, ही ग्राहकांची आशा फोल ठरली आहे. गेल्या ४० दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर बदलले नाहीत.
पेट्रोल-डिझेलचे १४ मार्चला असलेले दर आजही जवळपास तेच आहेत. त्यावेळी केंद्र सरकारने डिझेल आणि पेट्रोलवरील उत्पादन शुल्क हे प्रति लिटर ३ रुपयांनी वाढविले. त्यानंतर खनिज तेलाचे दर ३० टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल हे ३५ डॉलर झाले आहेत. या घसरणीनंतर पेट्रोलचा दर दिल्लीत प्रति लिटर ६९.८७ रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर ६२.५८ रुपये राहिला होता.
शनिवारी पेट्रोलचा दर प्रति लिटर ६९.५९ तर डिझेलचा दर प्रति लिटर ६२.२९ रुपये राहिला आहे. सध्या खनिज तेलाच्या प्रति बॅरलचा दर हा २० डॉलर आहे. मार्चपासून प्रति बॅरलचे दर हे १५ डॉलरने घसरले आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल हे प्रति लिटर हे ५ रुपयांनी कमी होणे अपेक्षित होते, असे इंडियन ऑईल मार्केटिंगच्या माजी अधिकाऱ्याने म्हटले आहे. विश्लेषकांच्या मते खनिज तेलाच्या एका बॅरलची किंमत एका डॉलरने कमी झाली तर पेट्रोल आणि डिझेलची किंमत ४० पैशांनी स्वस्त होते. दरम्यान, टाळेबंदीमुळे पेट्रोल-डिझेलच्या विक्रीवरही मोठा परिणाम झाला आहे.
हेही वाचा-दुकाने उघडण्याची घाई नको, राज्य सरकारच्या सूचनांची वाट पाहा - सीएआयटी
साधारणत: सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल व डिझेलच्या किमतीचा आढावा घेण्यात येतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील दराप्रमाणे पेट्रोल व डिझेलचे दर रोज सकाळी बदलण्यात येतात. मात्र, कंपन्यांनी गेल्या ४० दिवसांपासून दर बदलले नाहीत.
हेही वाचा-संसदीय समितीचा प्रस्ताव; 'या' कंपन्या बंद करण्याकरता सरकारची लागणार नाही परवानगी