नवी दिल्ली - देशात कांद्याच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे ग्राहकांना महागाईला सामोरे जावे लागत आहेत. ही स्थिती लक्षात घेता केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालय आणि केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने दिलासादायक निर्णय घेतला आहे. देशात कांदा आयात करण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत आयातीचे नियम सरकारने शिथील केले आहेत.
राखीव कांदा साठा हा खुल्या बाजारात उपलब्ध केला जाईल, असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. खरीपातील ३७ लाख टन कांदा बाजारात उपलब्ध होईल, असेही मंत्रालयाने म्हटले आहे. ही कांद्याची आवक बाजारात आल्यानंतर कांद्याच्या किमती कमी होणार असल्याचा अंदाज मंत्रालयाने व्यक्त केला आहे.
गेल्या काही दहा दिवसात कांद्याच्या किमती प्रति किलो ११.५६ रुपयावरून ५१.९५ रुपये झाल्या आहेत. किरकोळ बाजारात कांद्याच्या किमती पुणे जिल्ह्यासह काही जिल्ह्यात १०० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचल्या आहेत. कांदा आयातीसाठी २१ प्रकारच्या अटी शिथील केल्या आहेत. तसेच विदेशातील भारतीय राजदूत कार्यालयांना संबंधित देशांमधून कांदा निर्यात करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.
दरम्यान, कांद्याच्या किमती वाढत असताना केंद्र सरकारने सप्टेंबरमध्ये कांदा निर्यातीवर निर्बंध लागू केले आहेत. कांदा उत्पादक असलेल्या कर्नाटक, महाराष्ट्राला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्यामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाल्याने देशभरातील बाजारपेठांमध्ये कांद्याची कमी आवक होत आहे.