नवी दिल्ली – सोन्याच्या दरात प्रति तोळा 557 रुपयांनी घसरण झाली आहे. दिल्लीत सोन्याचा दर प्रति तोळा 52 हजार 350 रुपये असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.
चांदीच्या किमती प्रति किलो 1 हजार 606 रुपयांनी घसरून 66 हजार 736 रुपये झाल्या आहेत. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो हा 68 हजार 342 रुपये होता. तर सोन्याचा दर मागील सत्रात प्रति तोळा 52 हजार 907 रुपये होता. दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 557 रुपयांनी घसरला आहे. रुपया डॉलरच्या तुलनेत वधारल्याने सोन्याचे दर घसरल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपान पटेल यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर अंशत: वधारून प्रति औंस 1 हजार 930 डॉलर राहिला आहे. तर चांदीचा दर स्थिर राहून प्रति औंस हा 26.45 डॉलर राहिला आहे. अमेरिका-चीनमध्ये व्यापारविषयक चर्चा झाली असल्याने बाजारात सकारात्मक चित्र असल्याचे पटेल यांनी सांगितले.
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे नवनीत दमानी म्हणाले, कोरोनावरील उपचार भविष्यात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याचे दर अस्थिर झाले आहेत.