नवी दिल्ली - कांदे आणि बटाटे ही गरिबांसाठी भाजी असल्याचे मानले जाते. मात्र, कांदे आणि बटाट्यांच्या किमती गरिबांसह मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. दिल्लीत कांदा प्रति किलो ८० तर बटाटे प्रति किलो ७० रुपये आहे.
कोरोनाच्या संकटात अनेकांना रोजगारसह विविध संकटाचा सामना करावा लागत आहे. अशात कांदे-बटाटे महागल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. केवळ मजूर, आर्थिकदृष्ट्या मागासच नव्हे तर मध्यमवर्गीयांचे स्वयंपाकघरातील बजेट कोलमडले आहे. गेल्या आठवड्यापासून कांदे व बटाट्याच्या किमती वाढत आहेत.
कांदे व बटाट्याच्या किमती दिल्लीत घाऊकसह किरकोळ बाजारात वाढल्या आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक आदी राज्यांत झालेली अतिवृष्टी, पिकांचे नुकसान आणि बाजारात कमी होणार आवक या कारणांनी कांदे व बटाटे महागले आहेत. गेल्या आठवड्यात मदर डेअरच्या सफल विक्री दुकानात बटाट्याचा भाव प्रति किलो ५८ ते ६२ रुपये होता. तर कांदे काहीच दुकानात उपलब्ध होते.
कुटुंबाने काय खावे हा प्रश्न?
रिक्षाचालक सदार बजार म्हणाले, की मी दररोज सुमारे १५० ते २०० रुपये कमवितो. मी कांदे व बटाटे विकत घेण्याचा विचारही करू शकत नाही. आम्ही पाच जणांचे कुटुंब आहोत. त्यांना मी काय खायला घालू? इतर भाजीपालाही महाग झाला आहे.
दरम्यान, देशभरात कांद्यासह बटाट्याच्या किमती वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कांदा व बटाटा आयातीचा निर्णय गेतला आहे.