वॉशिंग्टन /नवी दिल्ली - स्टेट बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक अंशुला कांत यांची जागतिक बँक गटाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवड झाली आहे. याचबरोबर ते जागतिक बँक गटाचे मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून काम करणार आहेत. जागतिक बँक गटाचे अध्यक्ष डेव्हिड मॅलपास यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. कांत यांनी यापूर्वी मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून एसबीआयसाठी काम केले आहे.
अंशुला यांना ३५ वर्षांहून अधिक अनुभव-
अंशुला यांना वित्तीय, बँकिंगमधील तज्ज्ञ म्हणून ३५ वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांनी मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) म्हणून तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण वापर केला आहे. बँकेचे नेतृत्व करताना त्यांना जोखीम, कोषागार, वित्त पुरवठा, नियमनाचे अनुपालन असा वैविध्यपूर्ण अनुभव आहे. त्यांच्यावर जागतिक बँक गटाच्या वित्तीय आणि जोखीम व्यवस्थापनाची जबाबदारी असणार आहे. त्यांनी एसबीआयमध्ये महत्त्वपूर्ण व्यवस्थापकीय जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. यामध्ये वित्तीय कामगिरीचे अहवाल, जोखीम व्यवस्थापन आणि जागतिक बँकेच्या सीईओबरोबर काम करणे असा त्यांना अनुभव असल्याचे जागतिक बँक गटाने म्हटले आहे.
सीएफओ म्हणून त्यांनी एसबीआयचा ३८ अब्ज डॉलरचा महसूल आणि ५०० अब्ज डॉलरच्या मालमत्तेचे व्यवस्थापन केले आहे. तसेच त्यांनी व्यवस्थापकीय संचालक तसेच एसबीआय संचालक मंडळाचे सदस्य म्हणून सप्टेंबर २०१८ पासून जबाबदारी सांभाळली आहे. कांत यांनी गुंतवणुकीच्या संधी निर्माण केल्या आहेत. तसेच वित्तीय जोखीमचे सक्षमीकरण केले आहे. अंशुल कांत यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्रातपदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.