नवी दिल्ली - काँग्रेसचे वरिष्ठ नेता पी. चिदंबरम यांनी पहिल्या तिमाहीतील जीडीपीच्या आकडेवारीवरून मोदी सरकारवर टीका केली आहे. दोन वर्षांपूर्वीच्या तुलनेत जीडीपीचे प्रमाण कमी असल्याचे माजी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपीचा विकासदर हा 20.1 टक्क्यांनी वाढल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने म्हटले आहे.
पी. चिदंबरम यांनी ट्विटमध्ये म्हटले, की कोरोनापूर्वीच्या स्थितीच्या तुलनेत अनेक क्षेत्रांचा विकासदर हा अद्याप पोहोचला नाही. आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीमधील आकडेवारी स्पष्ट आहे. 2021-22 च्या पहिल्या तिमाहीमधील जीडीपी हा 32,38,828 कोटी रुपये आहे. तर आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये पहिल्या तिमाहीतील जीडीपी हा 35,66,788 कोटी रुपये होता.
हेही वाचा-कोरोनाचे नियम धुडकावत गावकऱ्यांच्या उपस्थितीत दहीहंडी; व्हिडिओ व्हायरल
खाणकाम, विद्युत निर्मिती, व्यापार, हॉटेल, परिवहन आणि आर्थिक क्षेत्रांच्या सेवा अजूनही कोरोनाच्या पूर्वीच्या स्थितीपर्यंत पोहोचल्या नाहीत. उत्पादन, गुंतवणूक अशा क्षेत्रांमध्ये आपण मागे आहोत.
हेही वाचा-भारत अफगाणिस्तानच्या घडामोडीत गुंग; चीनकडून हिंद महासागारात पोहोचण्याचा नवा मार्ग खुला
आपण अजूनही सावरलेलो नाहीत-
20.1 टक्के विकासदराचा आनंद साजरा करण्यापूर्वी हा विकासदर वाढला की कमी झाला याबाबत विचार करावा. कारण, 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत विकासदरात 24.4 टक्क्यांनी घसरण झाली होती. पहिल्या तिमाहीची आकडेवारी स्पष्ट आहे. गतवर्षीच्या घसरणीमधून आपण अजूनही सावरलेलो नाहीत.
हेही वाचा-महामारीत आशादायी चित्र; एप्रिल ते जून तिमाहीच्या जीडीपीत 21.1 टक्क्यांची वाढ
जीडीपीची आकडेवारी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून प्रसिद्ध
कोरोनाच्या काळात घसरलेल्या अर्थव्यस्थेसाठी दिलासादायक बातमी आहे. देशाच्या सकल उत्पादनात (जीडीपी) चालू वर्षाच्या एप्रिल ते जूनच्या तिमाहीत 20.1 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील तिमाहीत जीडीपीत 24.4 टक्क्यांची घसरण झाली होती. जीडीपीची आकडेवारी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने प्रसिद्ध केली आहे. कोरोना महामारीमुळे लागू केलेल्या बंधनामुळे अंदाजित जीडीपीवर परिणाम झाल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने म्हटले आहे.
..तरच जीडीपीत रिकव्हरी समजली जाऊ शकते -
केंद्राचा चार वर्षांचा नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाईनविषयीचा निर्णय मूर्खपणाचा असल्याची टीकाही चिदंबरम यांनी केली होती. याशिवाय जीडीपीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी भाष्य केले होते. या वर्षीही जीडीपी 2019-20 च्या स्थितीपर्यंत पोहोचणार नाही. 2020-21 मध्ये जीडीपीत मोठी घट झाली. 2021-22 मध्ये त्यात किंचीत सुधारणा दिसत आहे. मात्र, जोपर्यंत जीडीपी 2019-20 च्या स्थितीपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत याला रिकव्हरी असे म्हटले जाऊ शकत नाही, असे चिदंबरम यांनी अधोरेखित केले होते.